मुंबई- बॉलिवूड लव्हबर्ड्स रणबीर कपूर आणि आलिया भट्ट कुटुंब कबील्यासह राजस्थानमध्ये आलिशान हॉटेलमध्ये उतरले असल्यामुळे दोघांची एंगेजमेंट होणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. ते नवीन वर्षाचे स्वागत एकमेकांना रिंग घालून साजरे करणार का याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.
मंगळवारी सकाळी रणबीर, आलिया, त्याची आई नीतू कपूर, बहीण रिद्धिमा कपूर सहानी आणि मुलगी समारा यांना मुंबईच्या विमानतळावर पाहण्यात आले. काही वेळानंतर रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांनाही जयपूर विमानतळावर स्पॉट केले गेले. भट्ट कुटुंबीयही राजस्थानला जात असल्याचे अहवालात म्हटले आहे. आलियाचे निकटवर्तीय असलेले चित्रपट निर्माता करण जोहरही या सोहळ्यात सामील होणार आहेत.
आघाडीच्या वेबलोइड अहवालानुसार, रणबीर कपूर, आलिया आणि कुटुंबीय रणथंभोरच्या अमन हॉटेलमध्ये एकत्र राहत आहेत. रणबीर आणि आलियाच्या एंगेजमेंटविषयी कुजबूज जोरात सुरू झाली आहे. भट्ट, कपूर कुटुंबीयांसह बॉलिवूड सेलेब्रिटी राजस्थानला पोहोचत असल्यामुळे या संशयाला बळकटी मिळत आहे.