मुंबई- अभिनेत्री पायल घोष हिची वैद्यकीय तपासणी केली जाणार असून, अंधेरी येथील शासकीय रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले आहे. चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप याच्यावर तिने लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. त्यानुसार कश्यपवर गुन्हा दाखल झाला असून वर्सोवा पोलिसांच्या टीमने पायलच्या वैद्यकीय तपासणीसाठी तिला रुग्णालयात नेले आहे.
लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अनुराग कश्यपला १ ऑक्टोबर रोजी पोलिसांसमोर हजर होण्याचा समन्स बजावण्यात आला होता. त्यानुसार अनुराग कश्यप वर्सोवा पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहिला होता. २० सप्टेंबरला पायल घोष हिने कश्यपवर लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता.
वृत्तसंस्थेशी बोलताना पायल म्हणाली, ''पाच वर्षापूर्वी मी कामाच्या संदर्भात अनुराग कश्यपला भेटले होते. त्याने मला घरी बोलावले. मी जेव्हा त्याच्या घरी गेले तेव्हा त्याने मला वेगळ्या खोलीमध्ये नेले आणि माझा लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न केला. त्याने माझ्यावर बळजबरी केली होती.''
मी संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत कारवाई करण्याची विनंती करीत आहे आणि या सृजनशील माणसामागे दडलेल्या राक्षसाला द्वेष पाहू द्या. माझ्या सुरक्षेला धोका आहे आणि त्यामुळे माझे नुकसान होऊ शकते याची मला जाणीव आहे. मी त्याच्या विरोधात कारवाई करत आहे.'', असेही घोष म्हणाली.
या आरोपानंतर अनुराग कश्यपने ट्विटरवर प्रतिक्रिया देताना आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले होते. ''मी कधीही असे वागलेलो नाही किंवा कोणत्याही स्थितीत मी हे सहन करणार नाही,'' असे कश्यपने म्हटले होते.