मुंबई - जगभरात सध्या कोरोना व्हायरसची दहशत पसरली आहे. या व्हायरसमुळे आत्तापर्यंत बरेच लोक मृत्यूमुखी पडले आहेत. भारतातही या व्हायरसची भीती पसरली आहे. कलाविश्वालाही या व्हायरसचा फटका बसला आहे. २ एप्रिलला जेम्स बॉन्डचा 'नो टाईम टू डाय' हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र, कोरोना व्हायरस झपाट्याने पसरत असल्यामुळे सुरक्षिततेसाठी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख लांबली आहे.
होय, 'नो टाईम टू डाय' हा चित्रपट आता सात महिन्यानंतर म्हणजे १२ नोव्हेंबर २०२० ला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. जेम्स बॉन्डने ट्विटरद्वारे याबाबत माहिती शेअर केली आहे.
काही दिवसांपूर्वीच चित्रपटाची नवी तारीख जाहीर करण्यात आली होती. सुरुवातीला ३ एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाला संपूर्ण आठवड्याचा फायदा व्हावा यासाठी २ एप्रिल तारीख जाहीर झाली होती. मात्र, आता पुन्हा या चित्रपटाच्या प्रदर्शनामध्ये विलंब लागणार आहे. त्यामुळे जेम्स बॉन्डच्या चाहत्यांमध्येही नाराजी पसरली आहे. जेम्स बॉन्डची भूमिका पाहण्यासाठी आता चाहत्यांना नोव्हेंबर महिन्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे.