महाराष्ट्र

maharashtra

राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक मकरंद माने नवीन चित्रपट निर्मितीच्या तयारीत!

By

Published : Oct 5, 2020, 7:20 PM IST

पहिल्याच प्रयत्नात राष्ट्रीय पुरस्काराला गवसणी घालणारा दिग्दर्शक म्हणून मकरंद मानेंची वेगळी ओळख आहे. आता पुन्हा एकदा एक नवीन विषय प्रेक्षकांच्या भेटीला आणण्यासाठी मकरंद सज्ज झाला आहे.

Makrand Mane
मकरंद माने

मुंबई- ‘रिंगण’, ‘यंग्राड’, ‘कागर’ यासारखे अस्सल ग्रामीण पार्श्वभूमी असलेले वेगळे विषय मांडणारा दिग्दर्शक म्हणजे मकरंद माने. पहिल्याच प्रयत्नात राष्ट्रीय पुरस्काराला गवसणी घालणारा दिग्दर्शक म्हणून मकरंदची वेगळी ओळख आहे. आता पुन्हा एकदा एक नवीन विषय प्रेक्षकांच्या भेटीला आणण्यासाठी मकरंद सज्ज झाला आहे.

नवीन सिनेमाबद्दल बोलताना मकरंद सांगतो की, माझे आणि शशांक शेंडे यांचे ‘बहुरूपी प्रोडक्शन’ आणि विजय शिंदे यांचे ‘नाईंटीनाईन प्रोडक्शन’ यांनी एकत्र येऊन या नवीन सिनेमाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या आधीच्या सिनेमांप्रमाणे माझा नवीन विषयदेखील तुमच्या आमच्या घरातला अगदी जिव्हाळयाचा असेल एवढंच मी सध्या सांगू शकतो, असं त्याने ‘ई टीव्ही भारत’शी बोलताना सांगितलं आहे.

या नव्या सिनेमाचं चित्रीकरण एव्हाना सुरु झालं असून त्यात नक्की कोण दिसेल आणि त्याचा विषय नक्की काय असेल ते येत्या काही दिवसात स्पष्ट करणार असल्याचं त्याने स्पष्ट केलं आहे. ‘रिंगण’ हा मकरंद माने यांचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट होता. मात्र पहिल्याच सिनेमाला थेट राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने चित्रच पालटलं. त्यानंतर अनेक छोटे-मोठे निर्माते चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी मकरंद माने यांच्या संपर्कात होते. मात्र योग्य विषय सापडेपर्यंत मकरंदने तब्बल दोन वर्षे वाट पाहिली. ग्रामीण विषय उत्तमरित्या हाताळणे ही मकरंदची खासियत आहे.

त्याच्या ‘रिंगण’मधील कथेला पंढरपूरची पार्श्वभूमी होती. वारीच्या पार्श्वभूमीवर कथा रचताना त्याने अर्जुन आणि अभिमन्यू या बापलेकाचा जगण्यासाठीचा संघर्ष चित्रपटाद्वारे रंगवला. त्यानंतर आलेल्या ‘यंग्राड’मध्ये त्याने कुमारवयीन मुलांसमोर चुकीचे आदर्श निर्माण झाला तर ती कशी अडचणीत सापडतात ते दाखवलं. त्याच्या तिसऱ्या महत्वाकांक्षी सिनेमा ‘कागर’ ज्यात अभिनेत्री रिंकू राजगुरूची मुख्य भूमिकेत होती, त्यातून त्याने अस्सल ग्रामीण राजकीय पार्श्वभूमी असलेली एक स्वप्न पाहणारी मुलगी पहिल्यांदा उंबरठय़ाबाहेर पडते तेव्हा नक्की काय घडतं ते दाखवलं. आता पुन्हा एकदा मकरंद माने आपल्या आगामी सिनेमाच्या तयारीला लागले आहेत. त्यामुळे यावेळी हा राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक अस्सल मातीतला असा कोणता विषय आपल्सासमोर घेऊन येणार याबाबत उत्सुकता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details