महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

‘माझा गणोबा' मधून नंदेश उमप करताहेत ‘बाप्पा’ चे गुणगान! - Ganeshotsav 2021

यंदाचा गणेशोत्सव कोरोनाचं सावट असतानाही तितक्याच उत्साहात बाप्पाच्या आशीर्वादाने साजरा होणार आहे. या उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी श्रिया क्रिएशन निर्मित 'माझा गणोबा' हे गणपती बाप्पाला वाहिलेलं अनोखं गाणे गणेशभक्तांच्या भेटीला आलं आहे. ख्यातनाम पार्श्वगायक नंदेश विठ्ठल उमप यांनी हे गाणं गायलं असून गीतकार वर्षा राजेंद्र हुंजे यांनी ते लिहिलंय.

nandesh umap new ganpati bappa song
‘माझा गणोबा' मधून नंदेश उमप करताहेत ‘बाप्पा’ चे गुणगान!

By

Published : Sep 11, 2021, 7:26 AM IST

मुंबई -नंदेश उमप यांनी गायलेलं ‘माझा गणोबा’ हे ‘बाप्पा’ चे गुणगान करणारे नवीन गाणे गणेश भक्तांच्या भेटीला आलं आहे. यंदाचा गणेशोत्सव कोरोनाचं सावट असतानाही तितक्याच उत्साहात बाप्पाच्या आशीर्वादाने साजरा होणार आहे. या उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी श्रिया क्रिएशन निर्मित 'माझा गणोबा' हे गणपती बाप्पाला वाहिलेलं अनोखं गाणे गणेशभक्तांच्या भेटीला आलं आहे. ख्यातनाम पार्श्वगायक नंदेश विठ्ठल उमप यांनी हे गाणं गायलं असून गीतकार वर्षा राजेंद्र हुंजे यांनी ते लिहिलंय.

‘तुझा पहिला मान, देवा उघड कान, हाक भक्ताची जाण, द्यावे सुखाचे दान’ असे बोल असलेल्या या गाण्यातून बाप्पाकडे सुखाचे दान मागण्यात आले आहे. गणेशोत्सवावर कुठलंही संकट आलं तरी विघ्नहर्ता बाप्पा नेहमीच अशी संकटे निवारण करत आला आहे. आताही हे कोरोनाचं संकट बाप्पा दूर करेल, त्यासाठी या गाण्यातून गणपती बाप्पाला साकडे घालण्यात आले आहे. ते गाण्याच्या शेवटच्या अंतऱ्यातून ‘आधी आला ओला दुष्काळ वर कोरोना कर्दनकाळ, पोराबाळांची भारी आबाळदेवा तूच आता सांभाळ...’ असे म्हणत. या गाण्याचं रेकार्डिंग नुकतंच मुंबईतील आजीवासन स्टुडिओत झालं. यावेळी सुप्रसिद्ध गायक पं. सुरेश वाडकर हेही उपस्थित होते. त्यांनी गाणे ऐकून गाण्याच्या शब्दांची आणि संगीताची प्रशंसा करत शुभेच्छा दिल्या.

या गाण्याचं संगीत संयोजन आणि संगीत नंदेश उमप यांनी केले आहे. शिवाय त्यांनी आपल्या पहाडी आणि ठसकेबाज आवाजात हे गाणं गायलंही आहे. 'माझा गणोबा' हे गीत प्रेक्षकांना उत्सवात बेभान होऊन थिरकायला लावणारे आहे. वर्षा राजेंद्र हुंजे ह्या गेल्या काही वर्षांपासून गीत, गझल लेखन करतात. यापूर्वीही वर्षा हुंजे यांनी अनेक कविता, गझल लिहिल्या आहेत. त्या सोशल मीडियावर लोकप्रिय ठरल्या. शिवाय भक्तीरंगात न्हालेली आषाढीवारी वरील त्यांची एक रचना युवागायिका कार्तिकी गायकवाडच्या आवाजात रेकॉर्ड झाली आहे. याशिवाय त्यांची एक गझल काही दिवसांतच रसिकांच्या भेटीला येणार आहे.

जगावर कोरोनाचं संकट अजूनही घोंघावत आहे. त्याच अनुषंगाने वर्षा हुंजे यांनी बाप्पाला 'माझा गणोबा' या गाण्यातून साकडं घातलं आहे. या गाण्याबद्दल गीतकार वर्षा हुंजे म्हणाल्या, "ही प्रार्थना लिहिण्याची प्रेरणा मला गणपती बाप्पाकडूनच मिळाली. गेल्या दीडएक वर्ष कोरोनामुळे आपण भीतीच्या सावटाखाली वावरत आहोत, अशावेळी गणेश भक्तांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी ‘माझा गणोबा’ हे गाणं म्हणजे गणपती बाप्पाकडे केलेली एक प्रार्थना आहे.”

संगीतकार आणि गायक नंदेश उमप म्हणाले, "गणेशावरील गाण्याला मी पहिल्यांदाच संगीत दिलं आहे. हे गाणं माझ्याकडे आलं...त्यावेळी मी प्रवासात होतो. मुखडा ऐकल्यानंतर मी म्हटलं की, घरी पोहोचतो आणि डोक्यात आलेली चाल ऐकवतो. हार्मोनियम हातात घेतली आणि काही मिनिटातच चाल तयार झाली. त्यानंतर गीतकार आणि निर्मात्यांना ही चाल ऐकवली आणि लगेच निर्णय झाला की हे गाणं करायचं. आपला बाप्पा शंभर देशात जातो, तिथे त्याची प्रतिष्ठापना होते. तसंच हे गाणं शंभर देशात तितकंच जोरदार वाजणार आहे.”'माझा गणोबा' या गाण्याचे वितरण रिदम फिल्म्स आणि मीडिया करणार आहे. हे गाणं नंदेश उमप यांच्या ऑफिशियल युट्युब चॅनल आणि श्रिया क्रिएशनच्या ऑफिशियल युट्युब चॅनलवरुन रिलीज करण्यात आले आहे.

हेही वाचा -Ganeshotsav 2021: अष्टविनायकांपैकी पहिला मान असलेल्या मोरगावच्या मयुरेश्वर मंदिराची 'ही' आहेत वैशिष्टे

ABOUT THE AUTHOR

...view details