मुंबई -येथील वांद्र्यातील मॅजिस्ट्रेट न्यायालयाने बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचा आदेश दिला आहे. कंगनाच्या विरोधात एक याचिका दाखल करण्यात आली होती, त्यात तिच्यावर सामाजिक घृणेला प्रोत्साहन देण्याचे वक्तव्य केल्याचा आरोप आहे. या याचिकेवरील सुनावणी करताना न्यायालयाने हा आदेश दिला. तर न्यायालयाच्या या आदेशानंतर कंगनाने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
ती म्हणाली, 'कोण कोण नवरात्रीचे उपवास करत आहे? आजच्या नवरात्रीत घेतलेले फोटो, मी पण उपवास करत आहे. याचवेळी माझ्यावर एफआयआर दाखल करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील पप्पू सेनेला माझ्याविना कोणीच दिसत नाही आहे. माझी जास्त आठवण करू नका. मी लवकरच परत येईन', असे ट्विट तिने केले.
दरम्यान, कंगनावर आरोप आहे की, ती सोशल मीडिया प्लेटफॉर्मपासून टीव्हीपर्यंत प्रत्येक ठिकाणी बॉलिवूडमध्ये असलेल्या कथित वाईट गोष्टींच्या विरोधात बोलत आली आहे. तिने बॉलिवूडमध्ये कथित स्वरुपात पसरलेल्या अमली पदार्थ आणि वंशवादाच्या विरोधात बोलत राहिली आहे. याच्याच विरोधात दोन मुस्लिम व्यक्तींनी वांद्र्यातील न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. त्यात त्यांनी म्हटले, कंगना रणौतने आपल्या ट्विटच्या माध्यमातून दोन समुदायांमध्ये विरोध पसरवण्याचे काम करत आहे. यामुळे फक्त धार्मिक भावनाच नाही तर बॉलिवूडमधील अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
एफआयआरनंतर कंगनाची चौकशी करण्यात येणार आहे. तिच्या विरोधात सबळ पुरावे मिळाले तर तिला अटकही होण्याची शक्यता आहे.
तर याआधी कर्नाटकाच्या तुमकुरु जिल्ह्यातही अभिनेत्री कंगना रणौतविरोधात एफआयआर करण्यात येणार आहे.