मुंबई- भारतामध्ये कोविडच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाःकार माजला आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढत असतांना वैद्यकीय सेवा कमी पडत आहेत. तसेच लॉकडाऊनमुळे भारतासह संपूर्ण जगाचीही आर्थिक घडी बिघडली आहे. अनेक ठिकाणी ऑक्सिजन आणि औषधांचा तुटवडा जाणवत आहे. सामान्य माणसाला हा खर्च परवडत नाही. परंतु आपल्या समाजात सामाजिक बांधिलकी जपणारे सेलिब्रिटी सुद्धा आहेत. यातच टीव्ही आणि सिनेस्टार मौनी रॉयसुद्धा मदत करण्यासाठी पुढे सरसावली आहे.
सोशल मीडियाचा अवलंब
मौनी रॉय अशा काही अभिनेत्रींपैकी एक आहे, जिने नेहमीच उदात्त कामांना साथ दिली आहे. या भीषण रोगाच्या वेळी देखील मौनी आपल्या देशातील नागरिकांना शक्य तितकी मदत करत आहे. पश्चिम बंगाल येथील इस्कॉन फाउंडेशनचे प्रमुख स्थान मायापूर वैद्यकीय सुविधांच्या अभावामुळे, कसे पीडित आहे? याविषयी माहिती सामायिक करण्यासाठी ती आता सोशल मीडियाचा अवलंब करत आहे. आजूबाजूच्या परिसरातील तसेच झोपडपट्टीतील रुग्णालये, ऑक्सिजन सिलेंडर, ऑन कॉल डॉक्टर आणि संबंधित वैद्यकीय साहित्याचा अभाव यामुळे तेथील जनता त्रस्त आहे. इस्कॉन फाउंडेशन मायापुर मध्ये एक वैद्यकीय सुविधा उभारत आहे. ज्यामुळे कोविड-१९ काळात पीडित लोकांना योग्य वैद्यकीय सहाय्य मिळण्यास मदत होईल. मौनी रॉयने या उदात्त कारणासाठी तिच्या क्षमतेनुसार इस्कॉन फाउंडेशनला देणगी दिली आहे.