मुंबई (महाराष्ट्र)- यशराज फिल्म्सच्या पहिल्या ऐतिहासिक एपिक अॅक्शन ड्रामा 'पृथ्वीराज' ( Prithviraj)चा नुकताच रिलीज झालेला टीझर लक्षवेधी ठरला आहे. निर्भय आणि पराक्रमी राजपूत राजा पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आणि पराक्रमावर आधारित या चित्रपटात अक्षय कुमारची प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटात मिस वर्ल्ड २०१७ मानुषी छिल्लर ही राजकुमारी संयोगिताच्या भूमिकेत आहे. भारतातील एका मोठ्या नामांकित बॅनरखाली ती बॉलिवूड पदार्पण करीत आहे.
नवोदित अभिनेत्री मानुषी कृतज्ञता करताना म्हणाली, "मी YRF आणि माझे दिग्दर्शक डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांची सदैव ऋणी आहे. त्यांनी माझ्यावर राजकुमारी संयोगिताची भूमिका करू शकेन असा विश्वास दाखवला. मी मोठ्या पदार्पणासाठीची विचारणा केलेली नसतानादेखील पडद्यावर राजकुमारी साकारायला मिळणे मला सन्मान वाटतो."
तिच्या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना मानुषी म्हणते, "राजकुमारी संयोगिताचे जीवन, तिची मूल्ये, तिची लवचिकता, तिची हिंमत, तिचा सन्मान यावरून खूप दंतकथा बनल्या आहेत. याबद्दल तयारीच्या प्रक्रियेत मला खूप काही कळले. पडद्यावर राजकुमारी संयोगिताची भूमिका साकारताना मी तिला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. तिची कथा पाहण्यासाठी मी प्रत्येकांसारखीच उत्सुक आहे."