मुंबई- चित्रपटसृष्टीत कोणासोबतही फार ओळख नसताना बॉलिवूडमध्ये पदार्पण करणं आणि आपली ओळख निर्माण करणं ही सध्या कौतुकास्पद बाब माणली जाते. हिच गोष्ट कियारा अडवाणीलाही लागू होते. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या कियाराचा आज वाढदिवस.
कियाराचा जन्म ३१ जुलै १९९२ मध्ये मुंबईत सिंधी कुटुंबात झाला. मुंबईतच तिनं शिक्षणही घेतलं. कियारानं फग्ली चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. २०१४ मध्ये आलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा तितकासा प्रतिसाद मिळाला नसला तरी कियाराच्या अभिनयाचं कौतुक झालं.
कियारा नव्हे तर आलिया आहे खरं नाव -
कियाराचं खरं नाव हे आलिया अडवाणी आहे. एका मुलाखतीत तिनं स्वतः याबद्दल खुलासा केला होता. चित्रपटसृष्टीत आधीच एक आलिया असल्यानं पदार्पणाआधी हे नाव बदलून कियारा केल्याचं तिनं म्हटलं होतं.
या चित्रपटामुळे वडिलांनी दिली चित्रपटसृष्टीत येण्याची परवानगी -
कियाराला लहानपणापासूनच अभिनेत्री बनण्याची इच्छा होती. मुंबईच्या जय हिंद कॉलेज फॉर मास कम्युनिकेशनमधून शिक्षण घेतल्यानंतर काही दिवस तिनं अनुपम खेर आणि रोशन तनेजा यांच्याकडून अभिनयाचे धडे घेतले. कियाराचे वडील जगदीश आडवाणी यांनी २००९ साली ३ ईडियटस चित्रपट पाहिला. हाच चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी कियाराला अभिनय श्रेत्रात पदार्पण करण्याची परवानगी दिली. नेटफ्लिक्सवरील एंथोलॉजी, लस्ट स्टोरीज तर एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी आणि कबीर सिंग या चित्रपटांनी तिला विशेष पसंती मिळाली.