मुंबई -यावर्षीच्या बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट आहे. सहा महिने चालणार असणाऱ्या या शोचा तीन महिन्यांचा पूर्वार्ध ओटीटी प्लॅटफॉर्मवर असणार आहे. त्यानंतर तो टेलिव्हिजनवर येणार आहे. बिग बॉस हा रियालिटी शो त्यात होणाऱ्या शाब्दिक मारामाऱ्या (शारीरिक मारामाऱ्यांना मनाई आहे) आणि कॉंट्रोव्हर्सीजमुळे चर्चेत राहतो. अनेक सदस्य शिवीगाळही करताना दिसतात. टेलिव्हिजनवर त्यावेळी ‘बीप’ चा वापर केला जातो. परंतु आता हा शो ओटीटी वर २४ तास दिसणार असून तेथे सेन्सॉरशिपची आडकाठी नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात शिवीगाळ होणार याबद्दल शंकाच नाही.
गेले दशकभर टेलिव्हिजनवरील ‘बिग बॉस’ चे होस्टिंग सलमान खान करीत आलाय आणि याहीवर्षी तो या शोचे सूत्रसंचालन करताना दिसेल. परंतु बिग बॉस ओटीटीच्या सूत्रसंचालनासाठी करण जोहरची निवड करण्यात आली आहे. ‘तुला बिग बॉस च्या घरात जायला आवडेल का? आणि जावंच लागलं तर त्या घरात तुला कोणाबरोबर बंदिस्त व्हायला आवडेल?’ या प्रश्नावर करण जोहर उत्तरला की, ‘सर्वप्रथम म्हणजे या घरात मोबाईल वापरावर बंदी आहे आणि मी माझ्या मोबाइलपासून तासभरसुद्धा लांब राहू शकत नाही. त्यामुळे मी कधीच 'बिग बॉस च्या घरात जाणार नाही.’ दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देताना तो म्हणाला, ‘जर त्या घरात राहण्यासाठी जावंच लागलं तर मी माझ्या मैत्रिणी करीना आणि मलायका यांच्यासोबत जाईन. कारण त्याही त्यांच्या मोबाइलशिवाय जगूच शकत नाही. आणि त्यामुळे होणारी गम्मत व त्यांची त्रेधातिरपीट मला जवळून बघायला आवडेल.’