बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) कारने मनालीहून मुंबईला जात असताना पंजाबमधून प्रवास करीत होती. पंजाबमधील कीरतपूर साहिब टोल प्लाझाजवळ शेतकऱ्यांनी तिच्या गाडीला घेरले. त्यावेळी तिचे सुरक्षारक्षकही तिच्या सोबत होते. कंगनाने माफी मागावी अशी मागणी शेतकरी करीत होते. शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. बराच गोंधळ झाल्यानंतर कंगनाने सबुरीची भाषा केली व माफीही (Kangana Ranaut Apologizes) मागितली. त्यानंतरच तिची गाडी गर्दीतून पुढे जाऊ शकली. कंगनाने इन्स्टाग्राम स्टोरीवर तिचा याबाबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत तिच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री कंगना सातत्याने शेतकऱ्यांना टार्गेट करत आहे. कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलन करत असतानाही कंगना रणौतने शेतकऱ्यांवर वादग्रस्त वक्तव्य केले होते. यामुळे तिला अनेकदा ट्रोलचा सामना करावा लागला होता. पंजाबचा सुपरस्टार दिलजीत दोसांझसोबतचा तिचा वादही चर्चेत होता. आता कंगना रणौत पंजाबला गेली असताना तिच्या गाडीवर हल्ला झाला आहे. यादरम्यानचा व्हिडिओ अभिनेत्रीने शेअर केला आहे.
कंगना रणौतच्या गाडीला शेतकऱ्यांनी घेरले
शुक्रवारी कंगना रणौतने इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती पंजाबमधून प्रवास करीत आहे आणि तिची कार शेतकऱ्यांनी घेरलेली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. व्हिडिओ शेअर करताना कंगनाने कॅप्शनमध्ये लिहिले - मी पंजाबमध्ये प्रवेश करताच माझ्या कारवर जमावाने हल्ला केला. ते शेतकरी असल्याचे सांगत आहेत. याशिवाय कंगनाने आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती कारमध्ये बसलेली दिसत आहे. यादरम्यान कंगना म्हणते की- माझ्या कारला पुढे जाऊ दिले जात नाही. मी राजकारणी आहे का? हे कसले वर्तन आहे?