मुंबई- बॉलिवूड ‘क्वीन’ म्हणजेच कंगना राणावतचा आज ३२ वा वाढदिवस. कंगना सुरूवातीपासून अनेक वादांमुळे आणि आपल्या परखड बोलण्यामुळे चर्चेत असते. मात्र, हे जरी खरे असले तरी एका सामान्य मुलीला चित्रपटसृष्टीत पोहोचण्यासाठी आणि आपली ओळख निर्माण करण्यासाठी किती धडपड करावी लागते याचं उत्तम उदाहरण म्हणजेच कंगना.
कंगनाचा जन्म १९८७ मध्ये हिमाचल प्रदेशातील भामलातील एका लहानशा गावात झाला. एका सामान्य कुटुंबातील कंगनाच्या वडिलांची स्वप्न इतरांप्रमाणेच होती. कंगनाने डॉक्टर बनावं अशी त्यांची इच्छा होती. मात्र, कंगनाची स्वप्न काही वेगळीच होती आणि याच स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी कोणाच्याही मदतीची अपेक्षा न करता कंगनाने आपला प्रवास दिल्लीपासून सुरू केला. वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी कंगनाने दिल्ली गाठली आणि मॉडेलिंग क्षेत्रात पदार्पण करत आपल्या या प्रवासाला सुरूवात केली.