मुंबई - 'कबीर सिंह' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल करीत असताना दिसतोय. मात्र त्याच्यावर टीका करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा हे सध्या त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आहेत. त्यांनी सिने समिक्षिका अनुपमा चोप्रा यांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, ''जेव्हा तुम्ही कोणा पुरुषावर किंवा स्त्रीवर खूप खोलवर प्रेम करीत असाल तर यात भरपूर प्रामाणिकता असते. जर तुम्हाला फिजिकल डेमॉन्स्ट्रेशनचे स्वातंत्र्य नसेल किंवा एकमेकांना झापड मारण्याचे स्वातंत्र्य नसेल तर मला वाटत नाही की त्यांच्यामध्ये काही आहे.''
शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी यांच्या भूमिका असलेल्या 'कबीर सिंह'मध्ये काही असे सीन्स आहेत ज्यावर आक्षेप घेतला जातो. एका सीनमध्ये हिरो गर्लफ्रेंडला थप्पड मारतो आणि ती यावर काहीही प्रतिक्रिया देत नाही. हिरोचे हे वागणे सामान्य असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न होतोय, असे काही समिक्षक म्हणतात. यावर संदीप रेड्डी म्हणतात, की अर्जुन रेड्डी चित्रपटाच्यावेळीदेखील अशीच टीका झाली होती, पण हे फारच अजब आहे.