मुंबई- अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनाने केवळा भारतीयांनाच नाही तर परदेशातील चाहत्यांनाही दुःख झालंय. सुशांतला श्रद्धांजली वाहत इस्त्राईलच्या विदेश मंत्रालयाच्या जनरल आणि डेप्यूटी डायरेक्टर गिलाड कोहेन (Gilad Cohen) यांनी ट्विट केले आहे.
कोहेन यांनी लिहिलंय, '@its_sushant च्या निघून जाण्याने मनापासून संवेदना पाठवित आहे. इस्त्राईलचा सच्चा मित्र. तुझी आठवण येत राहील.'
या ट्विटसोबत सुशांतच्या 'मखना' या गाण्याची यूट्यूब लिंकही शेअर केली आहे. हे गाणे इस्त्राईलच्या सुंदर लोकेशन्सवर चित्रीत झाले होते. सुशांतचा 'ड्राइव' हा चित्रपट इस्त्राईलमध्ये शूट झाला होता. यात सुशांतसह जॅकलिन फर्नांडिस आणि बोमन इराणी यांनी सहभाग घेतला होता.
इस्त्राईलसह फ्रान्सच्या युनिव्हर्सिटीनेही सुशांतला श्रध्दांजली वाहिली आहे. युनिव्हर्सिटीने आपल्या वेबसाईटवर श्रध्दांजली वाहताना लिहिलंय, ''त्याने २०१९ च्या समरमध्ये युनिव्हर्सिटीला भेट देण्याचे मान्य केले होते. मात्र दुसऱ्या कामामध्ये अडकल्यामुळे तो स्ट्रासबोर्गची यात्रा करु शकला नव्हता. त्याचे कुटुंबिय आणि मित्रांसोबत आमच्या संवेदना आहेत. तो भारतीय आणि जगातील लोकांच्या कायम स्मरणात राहील.''
सुशांतच्या निधनानंतर अनेक बॉलिवूड सेलेब्रिटीजनी श्रद्धांजली वाहिली होती. त्याचे जवळचे मित्र आणि परिवार अंत्यसंस्कारात सहभागी झाला होता. आज त्याच्या मुळ पाटना शहरात गंगा नदीमध्ये अस्थींचे विसर्जन करण्यात आले. यावेळी त्याचे कुटुंबीय आणि नातेवाईक उपस्थित होते.