मुंबई - बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटांची यादी तयार केली तर त्यात गदर या चित्रपटाचा समावेस होतो. या चित्रपटातील गाणी आणि संवाद आजही लोकांच्या ओठावर आहेत. या चित्रपटातील सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या केमिस्ट्रीची बरीच प्रशंसा झाली होती. हा चित्रपट 2001 साली प्रदर्शित झाला होता. विशेष म्हणजे 19 कोटींमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 133 कोटींची कमाई केली होती. सनी देओलने साकारलेला तारा सिंग आणि अमिषा पटेलची सकीना ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात कायमची घर करुन राहिली.
आता या चित्रपटाचा दुसरा भाग तयार करण्यात येत आहे. अभिनेत्री अमिषा पटेलने चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर होताच व्हायरल झाला आहे. फोटोमध्ये अमिषा केशरी रंगाच्या सूटमध्ये दिसत आहे, तर सनी देओल लाल रंगाच्या कुर्ता पायजमामध्ये दिसत आहे. या फोटोवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.