मुंबई- अभिनेत्री दीपिका पदुकोण बऱ्याच दिवसांच्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा चित्रपटात झकण्यासाठी सज्ज झाली आहे. लवकरच ती 'छपाक' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाची अधिकृत घोषणा झाली होती. आता या चित्रपटातील दीपिकाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे.
या चित्रपटात दीपिका मालती नावाचं पात्र साकारणार आहे. दीपिकाने सोशल मीडियावर आपला हा लूक शेअर करत 'एक असे पात्र जे कायम माझ्यासोबत राहिल', असे कॅप्शन दिले आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणाला आजपासून सुरूवात होत आहे. अॅसिड हल्ल्यातील पीडित लक्ष्मी अगरवाल हिच्या जीवनसंघर्षावर आधारित हा सिनेमा असणार आहे. चित्रपटात अभिनेता विक्रांत मेस्सी लक्ष्मीच्या पतीच्या म्हणजेच आलोक दीक्षितच्या भूमिकेत दिसणार आहे.
मेघना गुलजार या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. १० जानेवारी २०२० ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी चित्रीकरण आणि प्रदर्शनाच्या तारखेविषयीची माहिती दिली आहे.