मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या संदर्भात मुंबई पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. या प्रकरणी शनिवारी बॉलिवूडमधील यशराज फिल्म्सचे निर्माता दिग्दर्शक आदित्य चोप्रा यांची मुंबई पोलिसांनी वर्सोवा पोलीस ठाण्यामध्ये तब्बल 3 तास चौकशी केली होती. या चौकशीनंतर संजय लीला भन्साळी व आदित्य चोप्रा या दोघांच्या जवाबात फरक असल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे.
संजय लीला भन्साळी यांच्याकडून मिळालेल्या जवाबात म्हटले आहे की, बाजीराव मस्तानीमध्ये त्यांना सुशांतसिंह राजपूतला घ्यायचे होते. यासाठी सुशांतसिंह राजपूत याच्याशी त्यांनी संपर्कसुद्धा साधला होता. मात्र, सुशांतचा यशराज फिल्म्ससोबत एका चित्रपटासाठी करार करण्यात आल्यामुळे त्याने या चित्रपटात काम करणे शक्य नसल्याचे म्हटले होते. संजय लीला भन्साळी यांनी म्हटले आहे की, त्यांनी स्वतः सुशांतसिंह राजपूत याला त्यांच्या चित्रपटात घेण्यासाठी यशराज फिल्म्ससोबत बोलणी केली होती.
तर, आदित्य चोप्रा यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, संजय लीला भन्साळी यांनी सुशांतसिंह राजपूत संदर्भात आपल्यासोबत चर्चा केली नव्हती. सुशांतसिंह राजपूतने यशराजसोबत करार केल्यामुळे भन्साळी यांना सुशांतला त्यांच्या सिनेमात घेता आले नसल्याचं म्हणणं चुकीचे असल्याचे आदित्य चोप्रा यांनी म्हटले आहे. तसेच रामलीला'मध्ये भन्साळी यांनी रणवीर सिंगला घेतले होते. मात्र, त्यावेळी रणवीर सिंगचा यशराज फिल्म्स सोबत सुद्धा करार होता, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी त्याच्या बँक अकाऊंटमधील काही तपशील तपासले असता त्यामध्ये वर्षभरापूर्वी युरोप येथे सुशांतसिंह राजपूत यांच्या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून मोठी खरेदी करण्यात आल्याचे समोर आले आहे . यासंदर्भात त्याची मैत्रीण रिया चक्रवर्तीचा जवाब पोलिसांनी घेतला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार एक वर्षापूर्वी आदित्य चोप्रा सोबत अॅड शूटच्या कामासाठी रिया चक्रवर्ती ही युरोपला गेली होती. यावेळी विमानाचे तिकीट, हॉटेल, अॅड शूटचा खर्च वगळता रिया चक्रवर्ती हिने केलेला सर्व खर्च हा सुशांतसिंह राजपूत याच्या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून करण्यात आला होता. गेल्या वर्षभरात सुशांतसिंह राजपूत याच्या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून रिया चक्रवर्ती हिने मोठ्या प्रमाणात खर्च केल्याचे समोर येत आहे. तर हा खर्च नक्की कुठल्या गोष्टींसाठी करण्यात आलेला होता याचा तपास पोलीस करत आहेत.