मुंबई - दोन स्त्रीयांच्या प्रेमात एकाचवेळी पडलेला पुरुष, घरवालीला धोका देऊन बाहरवालीसोबत मजा करणारा पुरुष किंवा एकाच वेळी अनेक मुलींच्या प्रेमात पडलेला प्रेमवीर, अशा अनेक कथांवर आधारित सिनेमे आपण पाहिलेत. मात्र ५० वर्षांचा पुरुष एका २६ वर्षाच्या मुलीच्या प्रेमात पडला तर त्याच्या आयुष्यात नक्की काय काय होऊ शकेल याची रंजक गोष्ट म्हणजेच 'दे दे प्यार दे' हा सिनेमा आहे.
दिग्दर्शन आणि निर्मिती -
साध्या सरळ वाटणाऱ्या पण तशा अजिबात नसणाऱ्या नातेसंबंधांवर आधारित सिनेमे बनवण्यात निर्माता लव रंजनचा हात कुणीच धरू शकत नाही. यावेळी निर्माता लवने दिग्दर्शक अकीव अलीच्या साथीने असाच एक वेगळा पण तेवढाच मनोरंजक सिनेमा बनवला आहे.
काय आहे कथा -
आकाश म्हणजेच अजय देवगण हा ५० वर्षाचा लंडनस्थित उद्योगपती आपल्या मित्राच्या बॅचलर पार्टीच्या निमित्ताने इशिता म्हणजेच अभिनेत्री रकुल प्रीत या २६ वर्षीय मुलीला भेटतो. तिचं सौंदर्य आणि वागणूक पाहून तिच्याकडे आकर्षित होतो. दुसरीकडे लंडनमध्ये शिकायला आलेली इशिता आकाशच्या आयुष्यातील रितेपण, त्याचा पैसा आणि सरत्या वर्षातही राखलेला चार्म पाहून आकर्षित होते. सुरुवातीला वयातील अंतर आणि त्यातून निर्माण होणारे प्रश्न याचा विचार करून हे दोघे वेळीच दूर जाण्याचा निर्णय घेतात. मात्र नंतर न रहावल्याने एका वळणावर वय समाज कशाचीही पर्वा न करता हे दोघे लग्न करण्याचा निर्णय घेतात. मात्र लग्न करण्यापूर्वी १६ वर्षांपूर्वी भारतात सोडून आलेल्या आपल्या पत्नी आणि मुलांना हा निर्णय एकदा सांगायचा असं ठरवून आकाश ईशिताला घेऊन भारतात येतो आणि इथून सिनेमाची खरी गोष्ट सुरू होते. इकडे भारतात आकाशाची पत्नी इंदू म्हणजे तब्बू, त्याचा एक मुलगा, एक मुलगी, आई, वडील असं कुटुंब असतं. या कुटुंबात परतल्यावर नक्की काय होतं. आकाशला इशिताशी लग्न करायची परवानगी मिळते का..? इंदू इशिताला सवत म्हणून स्वीकारते का..? का त्यांच्या नात्यात अजून काही नवे प्रश्न ऊभे राहतात, ते पाहायचं असेल तर त्यासाठी हा सिनेमा पाहायला हवा.