मुंबई- अभिषेक बच्चन, यामी गौतम आणि निम्रत यांच्या भूमिका असलेला दसवी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. मिश्कील विनोद, नाट्यमय प्रसंग आणि महत्त्वाचा संदेश असलेल्या या चित्रपटात अभिषेक एका मुख्यमंत्र्यांची भूमिका साकारत आहे जो तुरुंगात शिक्षा भोगत असून त्याला शिक्षणाचा अधिकार वापरायचा आहे. अडीच मिनिटांच्या ट्रेलरमध्ये गंगाराम चौधरीची भूमिका करणारा अभिषेक कसा तुरुंगात जातो हे दाखवण्यात आले आहे. जेलमध्ये त्याची गाठ आयपीएस अधिकारी ज्योती देसवालशी पडते. या भूमिकेत यामी गौतम कडक दिसत आहे.
दसवी या सामाजिक विनोदी चित्रपटात निम्रत कौर ही बिमला देवीच्या भूमिकेत आहे जी अभिषेक बच्चन भूमिका करीत असलेल्या गंगा रामची पत्नी आहे. गंगाराम जेलमध्ये गेल्यानंतर बिमला देवी मुख्यमंत्री बनते आणि हे पद तिला हवेहवेसे वाटू लागते. दरम्यान दहावीचा अभ्यास जेलमध्ये करताना गंगा राम दिसतो. हे सर्व प्रसंग चित्रपटाची रंगत वाढवणारे आहेत. चित्रपटाचा ट्रेलर उत्कंठा वाढवणारा आहे.