मुंबई - हिंदी चित्रपटसृष्टीतील दिवंगत गायक बप्पी लाहिरी यांनी आता जगाचा निरोप घेतला आहे. 15 फेब्रुवारी रोजी रात्री 11.45 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बप्पी दा यांच्या निधनाबद्दल त्यांचे जावई गोविंद बन्सल यांनी १५ फेब्रुवारीच्या रात्री काय घडले याची संपूर्ण कहाणी सांगितली आहे. बप्पी दाच्या जावयाने सांगितले की, जेवण केल्यानंतर अर्ध्या तासातच त्यांना हृदयविकाराचा झटका आला.
बप्पी दाचे जावई गोविंद बन्सल म्हणाले, 'हा दिवस आमच्यासाठी खूप दुःखाचा आहे, दादांनी संपूर्ण देशाचे मनोरंजन केले आणि प्रत्येकजण त्यांच्यावर प्रेम करतो'.
बप्पीच्या मृत्यूबद्दल गोविंद बन्सल म्हणाले, 'त्यांना तीन आठवड्यांहून अधिक काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते घरी परतले होते. त्यांनी 15 फेब्रुवारी रोजी रात्री 8:30 ते 9 च्या दरम्यान जेवण केले. परंतु जेवल्यानंतर अर्ध्या तासातच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्या नाडीचा वेग कमी होऊ लागला, आम्ही त्यांना तातडीने रुग्णालयात नेले आणि रात्री 11:44 वाजता डॉक्टरांनी आम्हाला त्यांच्या मृत्यूची माहिती दिली.