मुंबई- अर्जून कपूरची मुख्य भूमिका असलेला 'इंडियाज मोस्ट वॉन्टेड' चित्रपट येत्या शुक्रवारी म्हणजेच २४ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित 'पीएम मोदी' बायोपिकही प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे, बॉक्स ऑफिसवर या दोन बहुचर्चित चित्रपटांची टक्कर होणार आहे.
'पीएम मोदी' अन् 'इंडियाज मोस्ट वॉन्टेड'ची बॉक्स ऑफिसवर टक्कर, अर्जून म्हणतो...
अर्जूनचा इंडियाज मोस्ट वॉन्टेड आणि विवेक ओबेरॉयचा पीएम मोदी बायोपिक या चित्रपटांची २४ मे ला बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे. यावर आता अर्जूनने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
यावर बोलताना अर्जून कपूर म्हणाला, आजकाल चित्रपटांमध्ये क्लॅशसारख्या काही गोष्टी नसतात. सध्याच्या काळात एकाच दिवशी तीन-चार चित्रपट प्रदर्शित होत असतात. त्यामुळे, प्रेक्षक समजदार झाले आहेत. कोणता चित्रपट पाहायचा आणि कोणता नाही हे ठरवूनच ते चित्रपटगृहात जात असतात.
दरम्यान, 'पीएम मोदी' चित्रपटाचं प्रदर्शन गेल्या अनेक दिवसांपासून लांबणीवर पडलं आहे. निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट प्रदर्शित झाल्यास तो आचारसंहितेचा भंग असेल, असे म्हणत निवडणूक आयोगाने या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती दिली होती. त्यामुळे, आता निवडणुकांच्या निकालाच्या दुसऱ्या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आता बॉक्स ऑफिसवर नेमका कोणता चित्रपट बाजी मारणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.