मुंबई - सुशांतसिंग राजपूत याला काही काळासाठी डेटिंग करणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने सोशल मीडियावरुन सुशांतच्या परिवाराने अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या विरोधात एफआयआर दाखल केल्याच्या एका दिवसानंतर एक गुप्त पोस्ट शेअर केली आहे. अंकिताने पोस्ट केलेल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, 'सत्याचा विजय होतो'.
सुशांत आणि अंकिताचे प्रेमप्रकरण सहावर्षे सुरू होते. एकता कपूरच्या पवित्र रिश्ताच्या सेटवर दोघांची ओळख झाली होती. सुशांतच्या मृत्यूनंतर अंकिताने एक महिन्यांनी त्याच्या आठवणी जागवणारी पोस्ट लिहिली होती. आपल्या इन्स्टाग्रामवर एक दिव्याचा फोटो शेअर करीत तिने 'चाईल्ड ऑफ गॉड' असे कॅप्शनमध्ये लिहिले होते.
मंगळवारी सुशांतसिंहचे वडिल के के सिंह यांनी पाटण्याच्या राजीव नगर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केली. यात त्यांनी सुसांतच्या आत्महत्येला रिया चक्रवर्ती जबाबदार असल्याचे म्हटले आहे. सुशांतच्या मृत्यू प्रकरणाला यामुळे नाट्यमय वळण मिळाले आहे. या प्रकरणी आता बिहार पोलीस रियाची चौकशी करण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत.
पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीमध्ये सुशांतच्या वडिलांनी म्हटलंय की, ''माझा मुलगा मे २०१९ पर्यंत बॉलिवूडमध्ये चांगले काम करीत होता. रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबियांनी त्याच्याशी संपर्क साधला आणि त्याच्या संपर्काचा वापर फिल्म इंडस्ट्रीत करियर करण्यासाठी सुरू केला.''
"तिने तिच्या कुटुंबातील इंद्रजित चक्रवर्ती, संध्या चक्रवर्ती आणि शौविक चक्रवर्ती या सदस्यांसह, माझ्या मुलाच्या जीवनात हस्तक्षेप करण्यास सुरवात केली. त्यांनी सुशांतला घरात विचित्र गोष्टी असल्याचे सांगत घर सोडण्यासही भाग पाडले होते. याचा माझ्या मुलाच्या मनावर विपरित परिणाम झाला. त्यानंतर त्यांनी माझ्या मुलाला विमानतळाजवळील रिसॉर्टमध्ये राहायला भाग पाडले,'' असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.