मुंबई - बॉलिवूडचा शहेनशाह अमिताभ बच्चन सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. सतत नवनव्या पोस्ट लिहून ते चाहत्यांना खूश करीत असतात.
त्यांच्या पोस्टवरुन लक्षात येते की वडिलांशी त्यांचे नाते खूप हळवे होते. त्याच्या कविता आणि त्यांच्याशी संबंधित काही गोष्टी ते चाहत्यांसाठी नेहमी शेअर करीत असतात. अलिकडेच त्यांनी वडिलांची आठवण जागवली आहे आणि एक जुनी कविता शेअर केली आहे. ही कविता आजच्या स्थितीला लागू होणारी आहे.
हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेचे शीर्षक आहे 'अंधेरे का दीपक'. ही कविता वाचल्यानंतर अमिताभ यांनी याचा अनुवाद इंग्रजीत केला आहे.
त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ''कविता आशेच्या त्या किरणाबद्दल भाष्य करते, जे कठिण प्रसंगात आपल्यासोबत असतात. परंतु आपण त्याकडे लक्ष देत नाही. काहीवेळा नकारात्मकतेच्या अंधारात पाहण्याचा प्रयत्न करीत असतो.''
कवितेच्या शेवटी बिग बी यांनी लिहिलंय, ''उत्साह वाढवणाऱ्या माझे श्रध्देय बाबूजी यांच्या काव्यमय शब्दात.'' यावर चाहत्यांनी भरपूर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे.
कामाचा विचार करता त्यांचा आगामी 'गुलाबो सिताबो' हा चित्रपट येत्या १२ जूनला ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. त्यापाठोपाठ ब्रह्मास्त्र, झुंड आणि 'चेहरे' हे आगामी चित्रपट रिलीजच्या प्रतीक्षेत आहेत.