मुंबई- अमिताभ बच्चन सध्या आपल्या आगामी दाक्षिणात्य चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहेत. काही दिवसांपूर्वीच याबाबतची अधिकृत घोषणा झाली. मात्र, या सिनेमाचं नाव अद्यापही गुलदस्त्यातच आहे. अशात अमिताभ यांनी चित्रपटाच्या सेटवरील आणखी एक फोटो शेअर केला आहे.
या फोटोमध्ये अमिताभ यांच्यासोबत अभिषेक बच्चनही दिसत आहे. या फोटोला बिग बींनी खास कॅप्शनही दिलं आहे. जे प्रत्येक मुलाचं आणि वडिलांचं घट्ट नात उलगडणारं आहे. त्याने फक्त माझे शूज घातले नाहीत. तर तो ज्या खुर्च्यांवर बसलाय त्या खुर्च्यांची संख्याही मी बसलेल्या खुर्च्यांएवढीच आहे. त्यामुळे, तो फक्त माझा मुलगा असू शकत नाही. तर तो माझा जिवलग मित्रदेखील आहे, असे अमिताभ यांनी कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
या फोटोमध्ये अमिताभ खास दाक्षिणात्य लूकमध्ये दिसत आहेत. तर अभिषेक त्यांच्याशी काहीतरी संवाद साधताना दिसत आहे. बाप लेकाचा हा फोटो तुमचीही मने नक्कीच जिंकेल.