नवी दिल्ली - अभिनेता अक्षय कुमारने आपले भारतीयत्व सिध्द करण्यासाठी कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नसल्याचे सांगत भारतीय पासपोर्ट काढण्याचा निर्णय घेतलाय. तो कॅनडाचा नागरिक असल्यामुळे त्याच्यावर अनेकवेळा टीका झाली आहे. आपण कॅनडाचे नागरिकत्व कोणत्या परिस्थितीत स्वीकारले होते याचा खुलासा त्याने केलाय. कॅनडाचे नागरिकत्व सोडून पुन्हा भारतीय नागरिकत्व स्वीकारणार असल्याचे त्याने म्हटलंय.
कॅनडाचे नागरिकत्व का स्वीकारले होते सांगताना अक्षय म्हणाला, ''त्या काळात माझ्या सलग १४ फिल्म्स फ्लॉप झाल्या होत्या. त्यामुळे यातून सावरायला दुसरे काही तरी करायचे असा विचार मनात आला. माझा एक मित्र कॅनडात राहतो. त्याने मला तिथे येण्याचा सल्ला दिला. आपण मिळून काही तरी करू, असे तो म्हणाला. तोदेखील भारतीय आहे आणि कॅनडात वास्तव्यास आहे. त्यानंतर मी प्रक्रिया सुरू केली, पासपोर्ट मिळवला आणि इतरही आवश्यक गोष्टी केल्या. कारण माझे फिल्म करियर संपले, असे मला वाटत होते. मी जास्त काम करू शकेन, असे वाटत नव्हते. मात्र, १५ वा सिनेमा हिट झाला आणि त्यानंतर मी मागे वळून पाहिलेच नाही. मी पुढे जातच राहिलो. परंतु, माझा पासपोर्ट बदलावा असे वाटले नाही.''
त्याच्यावर होत असलेल्या आरोपानंतर अक्षयने भारतीय पासपोर्टसाठी अर्ज करायचे ठरवले आहे. त्याने जेव्हा भारतीय पासपोर्टसाठी अर्ज करायचा आणि कॅनेडियन नागरिकत्व बदलायचे ठरवले तेव्हा पुन्हा एकदा नेटीझन्स त्याला ट्रोल करीत आहेत. अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.