अजय देवगणने शेअर केला पोलिसांचे आभार मानणारा व्हिडिओ - mumbai police thanks to ajay devgn
अजयने हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर मुंबई पोलिसांनी देखील त्याचे आभार मानले आहेत.
मुंबई -सध्या देशभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. देशात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. लॉक डाऊन सुरू असल्यामुळे नागरिक घराबाहेर पडू शकत नाहीयेत. मात्र, अशा परिस्थितीत पोलीस प्रशासन आपले कर्तव्य चोखपणे बजावताना दिसत आहेत. डॉक्टर, नर्स, वैद्यकिय कर्मचारी यांच्यासह पोलीस यंत्रणा देखील नागरिकांच्या सुरक्षेसाठी तैनात झाली आहे. त्यामुळे अभिनेता अजय देवगन याने एका व्हिडिओ द्वारे त्यांचे आभार मानले आहेत.
सर्वसामान्य नागरिक घराबाहेर पडू न शकल्याने त्रस्त झाले आहेत. मात्र, दुसरीकडे इच्छा असूनही पोलिसांना आपल्या कुटुंबाला वेळ देता येत नाही. कोणताही सण असो, उत्सव असो किंवा कोणताही कार्यक्रम पोलिसांना आपले कर्तव्य बजावण्यासाठी घराबाहेर पडावेच लागते. मात्र, या लॉक डाऊनच्या काळात त्यांनाही सुट्टी मिळाली असती तर त्यांनी काय केलं असतं, हे या व्हिडिओ मध्ये दाखवण्यात आले आहे. कोणी कुटुंबासोबत वेळ घालवला असता, कोणी आपले छंद जोपासण्यासाठी वेळ दिला असता, कोणी मुलांबरोबर वेळ घालवला आता, कोणी कुटुंबासाठी स्वयंपाक बनवला असता, अशा साध्या साध्या गोष्टी त्यांना करण्यासाठी वेळ मिळत नाही. पण आपल्या सर्वांना तो मिळाला आहे. त्यामुळे मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करा, असे अजयने या या पोस्ट मध्ये म्हटले आहे.