मुंबई - कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या सुविधा नागरिकांपर्यंत पोहचाव्या म्हणून आत्तापर्यंत अनेक कलाकारांनी पीएम आणि सीएम मदत निधीसाठी आर्थिक हातभार लावला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही नागरिकांना खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले जात आहे. कलाकारांचा यामध्ये मोठा सहभाग आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याने यापूर्वी देखील पीएम केअर फंडमध्ये मदत दिली आहे. आता बीएमसीमध्येही कोरोनाशी लढण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी अक्षयने 3 कोटीची मदत केली आहे.
चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी याबाबातची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.
अक्षय कुमार अभिनयासोबतच सामाजिक कार्यातही सक्रिय आहे. त्याने आत्तापर्यत अनेक अडचणींच्या वेळी आर्थिक मदत दिली आहे. त्यामुळे सोशल मीडियावरही त्याची प्रशंसा केली जात आहे.
कोरोनाशी लढण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर न पडता, घरातच राहून काळजी घ्यावी, असे आवाहनही त्याने यापूर्वी व्हिडिओतून केले आहे. तसेच, या परिस्थितीत अहोरात्र मेहनत घेणारे डॉक्टर्स, नर्स, पोलीस यंत्रणा यांच्याविषयी देखील त्याने आभार व्यक्त केले आह. दिल से थँक्यू अशी टॅगलाईन असलेले पोस्टर हातात घेऊन त्याने फोटो शेअर केला होता. त्यानंतर इतर कलाकारांनी देखील सोशल मीडियावर दिल से थँक्यूचे पोस्टर घेऊन सर्वांचे आभार मानले आहेत.
अभिनेता सोनू सुदचीही मोठी मदत -
सोनू सुदने त्याचे जूहू येथील हॉटेल वैद्यकिय कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी दिले आहे. त्याच्याही या मदतीमुळे क्वारंटाईन केंद्रामध्ये मदत होईल.
देशात आत्तापर्यंत कोरोनाचे 6412 रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 504 रुग्ण बरे झाले आहेत. तर, मागच्या 12 तासात 30 पेक्षा अधिक लोकांचा बळी गेला आहे. आत्तापर्यंत मृतांची संख्या ही 199 इतकी झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी बाळगावी, असे आवाहन करण्यात येत आहे.