मुंबई - सध्या कंगना विरूद्ध शिवसेना असे चित्र तयार झाले आहे. कार्यालयावरील तोडक कारवाईनंतर कंगनाने काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधींना लक्ष्य केले आहे. महाराष्ट्रातील तुमच्या सरकारद्वारे मला जी वागणूक देण्यात आली. ते पाहून तुम्हाला एक महिला असल्याच्या नात्यानं दु:ख झालं नाही, असा खोचक सवाल कंगनाने केला. तसेच दुसऱ्या टि्वटमध्ये कंगनाने दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे माझे आदर्श असल्याचं म्हटलं असून त्यांचा एक जूना मुलाखतीचा व्हिडिओ शेअर केला आहे.
'तुमच्या सरकारनं माझ्यासोबत जी वागणूक केली. ते पाहून एक महिला असल्याच्या नात्यानं तुम्हाला दु:ख झालं नाही का? डॉ. आंबेडकरांनी आपल्या दिलेल्या संविधानाचे सिद्धांत कायम राखण्याची विनंती तुम्ही आपल्या सरकारला करू शकत नाही?, असा सवाल कंगनाने काँग्रेच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधींना टि्वट्च्या माध्यमातून केला.
तसेच दुसऱ्या टि्वटमध्ये कंगनाने दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे आपले आदर्श असल्याचं म्हटलं आहे. ' शिवसेना गंठबंधन करेल आणि काँग्रेसी बनेल, ही भिती त्यांना होती. आज पक्षाची स्थिती पाहून त्यांच्या काय भावना असतील, असा सवाल कंगनाने केला आहे.
अभिनेत्री कंगना रनौत सुरुवातीपासूनच सुशांतसिंह राजपूत प्रकरणात खूप सक्रिय आहे. या प्रकरणात तिने सातत्याने मोठी विधाने केली आहेत. मुंबईला पाकव्यापत काश्मीर म्हटल्यानंतर तिच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेकडून तोडक कारवाई करण्यात आली. या घटनने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. शिवसेनेशी पंगा घेतल्यानंतर भाजपने कंगनाला खुले समर्थन दिले आहे. दरम्यान, आपल्या एका व्हिडिओत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना, त्यांचा एकेरी उल्लेख केल्याने तिच्याविरोधात तक्रार दाखल झाली आहे.मात्र, कंगनास समर्थ देणाऱ्या भाजप नेत्यांनी मुंबईला पाकिस्तान म्हटले आणि उद्धव ठाकरेंना एकेरी संबोधल्याबद्दल अद्यापही प्रतिक्रिया दिल्या नाहीत.