‘काम नसेल तेव्हा मला घरी राहायला आवडते तसेच घरची कामे करायला पण आवडते’ - दीपिका पदुकोण
गेहराईयाँ’ मधील माझी भूमिका खूप क्लिष्ट असून ती करताना त्यातील अनेक थर चितारताना दमछाक झाली. खरंतर याचे कथानक ऐकल्यावर ते आवडूनही मी होकार देण्यासाठी दोन-तीन दिवस घेतले. कारण ‘हो’ म्हणण्याआधी मला स्वतःला खातरजमा करून घ्यायची होती की या भूमिकेला हवी असणारी मानसिक आणि भावनिक ऊर्जा मी देऊ शकेन की नाही”, असे या चित्रपटातील अभिनेत्री दीपिका पदुकोणने ईटीव्ही भारतसोबत बोलताना सांगितले.
नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘गेहराईयाँ’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन शकुन बात्राचे असून यात अनन्या पांडे, धैय कारवा, सिद्धांत चतुर्वेदी आणि दीपिका पदुकोण यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मानवी भावनांचा कल्लोळ या चित्रपटातून अनुभवायला मिळतो आणि कलाकारांसाठी हा चित्रपट मानसिकरीत्या पिळवटून टाकणारा होता. ‘गेहराईयाँ’ मधील माझी भूमिका खूप क्लिष्ट असून ती करताना त्यातील अनेक थर चितारताना दमछाक झाली. खरंतर याचे कथानक ऐकल्यावर ते आवडूनही मी होकार देण्यासाठी दोन-तीन दिवस घेतले. कारण ‘हो’ म्हणण्याआधी मला स्वतःला खातरजमा करून घ्यायची होती की या भूमिकेला हवी असणारी मानसिक आणि भावनिक ऊर्जा मी देऊ शकेन की नाही”, असे या चित्रपटातील अभिनेत्री दीपिका पदुकोणने ईटीव्ही भारतसोबत बोलताना सांगितले.
दीपिकाने फिल्म इंडस्ट्रीमध्ये नुकतीच १५ वर्षे पूर्ण केलीयेत. दिग्दर्शक शकुन बात्राबद्दल ती म्हणाली की, “मला नेहमीच शकुनसोबत काम करायचं होतं. त्याचा ‘कपूर अँड सन्स’ माझा आवडता चित्रपट आहे. त्याच्या चित्रपटाच्या कथा रियलिस्टिक असतात. मला ‘पिकू’, ‘तमाशा’ सारख्या चित्रपटातून भिन्न्न प्रवृत्तीच्या भूमिका करायला मिळाल्या. ‘गेहराईयाँ’ सारखा चित्रपट याआधी मी कधीच केलेला नाहीये. यातील भूमिकेतील विविध पदर आणि भावनिक गुंतागुंत मला भावली आणि म्हणून मी एक स्वतःलाच चॅलेंज देत ही भूमिका करण्याचा निर्णय घेतला. शकुनने प्रत्येक पात्र डिटेलमध्ये लिहिले आहेत. हो, म्हणजे अशा प्रकारच्या प्रसंगातून गेलेली व्यक्ती माझ्या परिचयाची नसली तरी अशा गोष्टी घडत असतात. त्याबद्दल आपण वाचत असतो, ऐकत असतो. शकुन नेहमीच वास्तविक भूमिकांना समोर आणतो आणि मलासुद्धा प्रेक्षक म्हणून वास्तववादी चित्रपट अधिक भावतात. अर्थातच शकुनची भरपूर मदत झाली माझे पात्र साकारताना.”
तिच्या काम करण्याच्या पद्धतीबद्दल विचारले असता दीपिका म्हणाली, “मी काम आणि घर याचे मिश्रण करीत नाही. मी बाहेरचं विश्व घरात आणत नाही. स्विच ऑन व स्विच ऑफमध्ये मी बिलिव्ह करते. सेटवर जर एखादा क्लिष्ट भावनिक प्रसंग करणार असते तेव्हा मी फारशी कोणाशी बोलत नाही. बऱ्याचदा मी गाणी ऐकते आणि शक्यतो मनाला शांत ठेवते. मी कठीण वाटणारे सीन्स कोणाबरोबर डिस्कस करीत नाही किंवा कोणाला त्याबद्दल विचारतही नाही. तसेच इतरवेळी मी बऱ्याच गप्पा मारते, सर्वांबरोबर एकत्र जेवण करते. मी काही मेथड ॲक्टिंग करीत नाही. उस्फुर्तपणे सीन करण्यावर माझा विश्वास आहे. एखाद्या भूमिकेसाठी जरुरीपेक्षा जास्त विचार करणंही कधी कधी मारक ठरतं. परंतु घरी आल्यावर मी दीपिका असते. मी भाजी आणते, स्वयंपाक करते, कपडे धुते म्हणजे एक गृहिणी घरात वावरते तशी मी असते. हो, मला घरी राहायला आवडते तसेच घरची कामे करायला पण आवडते. गेहराईयाँमध्ये खूप मानसिक तणाव आणणारे सीन्स आहेत. परंतु घरी मात्र त्याचा परिणाम कधी जाणवला नाही. काल परवाच रणवीर मला म्हणाला की, तू इतकी इंटेन्स फिल्म केलीयेस हे तुझ्या घरातील वावरावरून जाणवलं सुद्धा नाही.”
दीपिका पदुकोण खूप मोठी स्टार आहे आणि ‘गेहराईयाँ’ मधील तिचे सहकलाकार बरेच नवखे आहेत. अनन्या पांडे, धैर्य कारवा, सिद्धांत चतुर्वेदी यांच्या या चित्रपटात भूमिका आहेत. त्यांचे अवघडलेपण दूर व्हावं म्हणून दीपिकाने दिग्दर्शकाला सांगितले की, शूटिंग सुरू होण्याआधी पंधराएक दिवस सर्वांनी एकत्र वेळ घालवूया आणि ते सर्व गोव्यात एकत्र राहिले आणि एकमेकांसोबत ‘चिल’ केले. त्यामुळे इतरांची भीड चेपली गेली आणि त्याचा फायदा शूटिंग करताना झाला. शकुनने सांगितले होते की, दीपिका इतकी मोठी स्टार असूनही एखाद्या स्टुडंटप्रमाणे दिग्दर्शकाकडून भूमिकेबद्दल समजावून घेते.
‘गेहराईयाँ’ची कहाणी दोन बहिणींबाबत आहे. दीपिकालासुद्धा लहान बहीण आहे, अनिषा. तिच्याबद्दल सांगताना दीपिका म्हणाली, “आमच्या दोघांत ५ वर्षांचे अंतर आहे. सुरुवातीला मी तिची जास्त काळजी घ्यायची, एकदम आईप्रमाणे. त्यामुळे अनिषा म्हणायची की, ‘अरे देवा, मला दोन दोन आया आहेत’. परंतु गेल्या दशकभरात आमचे नाते मैत्रीचे झाले आहे. आम्ही एकमेकांशी सर्वकाही शेअर करतो. माझा स्टारडम ती रिस्पेक्ट करते. मात्र, त्याने कधी प्रभावित होत नाही. ती माझा ‘रियालिटी चेक’ आहे कारण ती खोटी स्तुती कधीच करीत नाही.” दीपिका पदुकोण स्टारडम बद्दल कधी विचार करीत नाही. चांगले काम करणे आणि आपल्या भूमिकांतून लोकांना प्रेरित करणे हे तिचे लक्ष्य आहे.