मुंबई- 'ओम शांती ओम' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या दीपिकाने काही दिवसांतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं. तिच्या बहुतेक चित्रपटांना प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. बाजीराव मस्तानी, रामलीला आणि पद्मावतसारख्या चित्रपटांतील तिच्या भूमिकांना तर विशेष पसंती मिळाली. असं असतानाही दीपिकाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार का मिळाला नाही? असा सवाल चाहत्यांनी केला आहे.
आलियामुळे चाहते दीपिकावर नाराज, दीपिकानं मागितली माफी - filmfare
दीपिकाने स्वतः चाहत्यांची माफी मागितली आहे. तुमच्या अपेक्षा मी पूर्ण करू शकले नाही, यासाठी माफी मागते, असं ट्विट तिने केलं आहे
नुकतंच फिल्मफेअर २०१९ सोहळा पार पडला. मात्र, या पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार आलिया भट्टला देण्यात आला. राजी चित्रपटासाठी तिला हा पुरस्कार देण्यात आला. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार रणवीर आणि आयुषमानला विभागून देण्यात आला. मग सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही दीपिका आणि आलियाला विभागून का दिला गेला नाही, असा सवाल दीपिकाच्या फॅन पेजवरून विचारण्यात आला आहे.
विशेष म्हणजे याबद्दल दीपिकाने स्वतः चाहत्यांची माफी मागितली आहे. तुमच्या अपेक्षा मी पूर्ण करू शकले नाही, यासाठी माफी मागते. यापुढे मी खूप मेहनत घेईल, असे ट्विट दीपिकाने आपल्या फॅन पेजवर केले आहे. दीपिका लवकरच 'छपाक' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.