मुंबई- अभिनेता अभिषेक बच्चन याची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. मुंबईतील नानावटी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. अखेर अभिषेकने कोरोनावर मात केली असून, त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. अभिषेकने ट्विट करत ही माहिती दिली आहे.
ट्विटरवर त्याने लिहिलंय: " वचन म्हणजे वचन आहे! आज दुपारी माझी कोविड -१९ ची चाचणी निगेटिव्ह आली. मी तुम्हाला सांगितले होते तसा मी कोरोनावर विजय मिळवला आहे. माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी केलेल्या प्रार्थनेबद्दल सर्वांचे धन्यवाद."
मेडिकल आणि हेल्थकेअर कर्मचार्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना त्याने लिहिलंय, : "नानावती हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. माझी आणि माझ्या कुटुंबाची त्यांनी चांगली काळजी घेतली आणि कोविड-१९ वर विजय मिळवण्यात मदत केली. यांच्याशिवाय हे शक्य झाले नसते.''
यापूर्वी, 2 ऑगस्ट रोजी त्याचे वडील अभिनेता अमिताभ बच्चन यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. मात्र, अभिषेकला रुग्णालयातच थांबावे लागले होते. तेव्हा या आजारातून पुन्हा परतण्याचे आश्वासन अभिषेक बच्चनने दिले होते. त्यानुसार आज तो बरा झाल्याने त्याला वचनपूर्ती केल्याचा आनंद झाला आहे.