नवी दिल्ली :एव्हीयन इन्फ्लूएंझा ए ( H3N8 ) या विषाणूमुळे चीनमध्ये पहिला मृत्यू झाल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने बुधवारी दिली आहे. त्यामुळे जगभरात एकच खळबळ उडाली आहे. चीनने 27 मार्चला 56 वर्षीय महिलेला एच३ एन८ H3N8 विषाणूची लागण झाल्याीच माहिती जागतिक आरोग्य संघटनेला दिली होती. ग्वांगडोंग प्रांतातील महिला 22 फेब्रुवारीला या विषाणूमुळे आजारी पडली होती. आजारी महिलेला 3 मार्चला गंभीर न्यूमोनिया झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर 16 मार्चला या महिलेचा मृत्यू झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे.
बाधित कोंबड्यांच्या संपर्कात आली होती महिला :चीनमधील मृत महिला ही बाधित कोंबड्यांच्या संपर्कात आल्याची माहिती आरोग्य संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे. आजार सुरू होण्यापूर्वी या महिलेचा पोल्ट्रीच्या संपर्कात येण्याचा इतिहास होता. तिच्या घराभोवती वन्य पक्ष्यांच्या राहण्याचा इतिहास असल्याचेही जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. या घटनेच्या प्राथमिक साथीच्या तपासणीत जीवंत पोल्ट्री मार्केटमध्ये येणे हे संसर्गाचे कारण असू शकते असेही आरोग्य अधिकार्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांना संक्रमित व्यक्तीच्या जवळच्या संपर्कांमध्ये इतर कोणतीही प्रकरणे आढळली नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.