सॅन फ्रान्सिस्को : आजपासून ट्विटरवरील ब्लू व्हेरिफिकेशनसाठी पैसे आकारले जाण्याची घोषणा ट्विटरकडून करण्यात आली आहे. त्यामुळे या अगोदर ज्यांच्या ट्विटरवर ब्लू टीक होती ती आजपासून काढून टाकण्यात येणार असल्याचे ट्विटरकडून स्पष्ट करण्यात आले होते. मात्र व्हाईट हाऊसने ट्विटरला चांगलाच दणका दिला आहे. व्हाईट हाऊस आपल्या कर्मचार्यांच्या अधिकृत ट्विटर प्रोफाइलची पडताळणी सुरू ठेवण्यासाठी पैसे देणार नसल्याचे व्हाईट हाऊसकडून स्पष्ट करण्यात आल्याचा दावा अॅक्सिओसच्या अहवालातून देण्यात आला आहे. व्हाईट हाऊसचे डिजिटल रणनीती संचालक रॉब फ्लाहर्टी यांनी कर्मचाऱ्यांना ईमेलद्वारे याबाबतची माहिती दिल्याचेही या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
ट्विटर देऊ शकणार नाही पडताळणीची हमी :एलन मस्क यांनी ट्विटरची सूत्रे हाती घेतल्यानंतर ट्विटरच्या ब्लू व्हेरिफेकेशनसाठी पैसे मोजावे लागणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार एक एप्रिलपासून हे धोरण लागू होणार आहे. मात्र ट्विटरच्या ब्लू सेवेची पडताळणी ही सरकारी संस्थांना लागू होईलच, असे नाही. ट्विटरची ब्लू सेवा व्यक्तीची पडताळणी करत नाही, तर ती वापरकर्ता सशुल्क आहे की नाही, याची पडताळणी करणार असल्याचे व्हाईट हाऊसच्या रॉब फ्लाहर्टी यांनी स्पष्ट केले आहे. व्हाईट हाऊसमधील राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती राखाडी चेकमार्कने पडताळले जाणार असल्याचेही ट्विटरच्या वतीने स्पष्ट करण्यात आले होते. ट्विटरच्या अद्ययावत धोरणांनुसार ते यापुढे फेडरल एजन्सीच्या खात्यांसाठी पडताळणीची हमी देऊ शकणार नसल्याचेही रॉब फ्लाहर्टी यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.