हैदराबाद : Students Day 2023 दरवर्षी 15 ऑक्टोबर रोजी भारतात 'विद्यार्थी दिन' साजरा केला जातो. हा दिवस भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. अवुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. सामान्यतः 'लोकांचे राष्ट्रपती' म्हणून ओळखले जाणारे डॉ. कलाम यांनी देशाचे 11 वे राष्ट्रपती म्हणून काम केले (2002 ते 2007 पर्यंत). देश-विदेशात डॉ.कलाम हे शैक्षणिक, लेखक, वैज्ञानिक आणि इतर अनेक क्षेत्रांतील अमूल्य योगदानासाठी ओळखले जातात.
विद्यार्थी दिन साजरा-डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची भूमिका आणि त्यांची शिकवणीची बांधिलकीचे शब्दात वर्णन करता येणार नाही. त्यांना अध्यापनाची इतकी आवड होती की भारताचे ११वे राष्ट्रपती म्हणून पद सोडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ते अध्यापनात परतले. त्यांनी नोव्हेंबर 2001 पासून अण्णा विद्यापीठ चेन्नईमध्ये प्राध्यापक म्हणून सक्रियपणे काम केले. चारित्र्य, मानवी गुण घडवणे, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मुलांची शिकण्याची क्षमता वाढवणे आणि नाविन्यपूर्ण आणि सर्जनशील होण्याचा आत्मविश्वास वाढवणे ही शिक्षकाची भूमिका असायला हवी. ज्यामुळे त्यांना भविष्यात स्पर्धात्मक बनण्यास मदत होईल, असे मत डॉ. कलाम यांनी व्यक्त केले.
'विद्यार्थी दिन' 2023 ची थीम :यंदा'अपयश म्हणजे शिकण्याचा पहिला प्रयत्न' अशी विद्यार्थी दिनाची संकल्पना ठेवण्यात आली आहे. अलीकडच्या काळात विद्यार्थ्यांमधील वाढत्या आत्महत्येच्या घटना लक्षात घेता ही थीम अगदी योग्य आहे. हा विषय भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने मांडला आहे. डॉ. कलाम यांनी नेहमीच आपल्या विद्यार्थ्यांना सर्वोत्तम बनण्यासाठी प्रोत्साहित केले. आज 'जागतिक विद्यार्थी दिन' नसून हा दिवस भारतात 'विद्यार्थी दिन' साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रसंघानं 15 ऑक्टोबरला आज जागतिक विद्यार्थी दिन असल्याची कोणतीही घोषणा केली नसल्याचं यापूर्वीच स्पष्ट केलं.
तत्त्वे आणि विचारांशी बांधिलकी :डॉ. कलाम यांना जगाने शिक्षक म्हणून स्मरण करावे अशी त्यांची इच्छा होती. विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आणि नवीन कल्पना ऐकण्यात त्यांना आनंद वाटायचा. 'स्वप्न पाहण्यासाठी तुम्हाला एक स्वप्न असणे आवश्यक आहे' या त्यांच्या प्रसिद्ध वाक्यानं तरुण पिढीला त्यांची आवड जोपासण्यासाठी प्रेरित केले. त्यांची मते आणि भावना मोठ्या प्रमाणावर मांडल्या जातात. कलाम यांची तत्त्वे आणि विचारांशी असलेली बांधिलकी अनेकांना प्रेरक आहे. त्यामुळे त्यांचा जन्मदिवस 'विद्यार्थी दिन' म्हणून ओळखणे योग्य आहे.
डॉ.कलाम यांचा जन्म 1931 मध्ये रामेश्वरम येथे झाला : डॉ. अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी भारतातील पंबन बेटावरील रामेश्वरम या तीर्थक्षेत्रातील तामिळ मुस्लिम कुटुंबात झाला. त्यांनी 'सेंट जोसेफ कॉलेज'मधून भौतिकशास्त्रात पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी मद्रासमधील 'इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी' येथे वैमानिक अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आणि 'डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनच्या एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट'मध्ये सामील झाले. त्यांची कारकीर्द खूप चांगली होती. शास्त्रज्ञ म्हणून त्यांनी मोठी कीर्ती मिळवली. ९० च्या दशकात ते भारतातील सर्वात प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ होते.
कलाम यांचे कार्य :
- डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम हे भारताचे 11 वे राष्ट्रपती (2002-2007) होते. 2020 पर्यंत भारताला विकसित राष्ट्रात रूपांतरित करण्याचे त्यांचे ध्येय होते.
- त्यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात त्यांना भरभरून प्रेम मिळाले.
- त्यांच्या सहजतेने आणि साधेपणामुळे त्यांना लोकांचे अध्यक्ष म्हटले जाऊ लागले.
- डॉ.कलाम यांना आयुष्यभर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
- डॉ. कलाम यांना 30 विद्यापीठे आणि नामांकित संस्थांकडून मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली.
- त्यांना 1981 मध्ये 'पद्मभूषण' आणि 1990 मध्ये 'पद्मविभूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
- त्यांच्या संशोधन कार्यासाठी त्यांना 'भारतरत्न' (1997) देण्यात आला होता.
- त्यांनी त्यांच्या हयातीत अनेक पुस्तके लिहिली, त्यापैकी 'विंग्ज ऑफ फायर', 'माय जर्नी', 'इग्निटेड माइंड्स' ही प्रमुख पुस्तके आहेत. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांची अनेक भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये भाषांतरे झाली.
- डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी 1998 मध्ये यशस्वी 'पोखरण II अणुचाचणी'मध्येही महत्त्वाची भूमिका बजावली होती, ज्यासाठी त्यांना 'मिसाईल मॅन ऑफ इंडिया' म्हणून गौरवण्यात आले.
- डॉ. कलाम हे जुलै 1992 ते डिसेंबर 1999 या काळात केंद्रीय संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार आणि संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव होते.
- यानंतर, नोव्हेंबर 1999 ते नोव्हेंबर 2001 पर्यंत ते भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार होते. या काळात त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाले होते.
हेही वाचा :
- आज डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलामांची जयंती; पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
- Dr Abdul Kalam Death Anniversary: डॉ. अब्दुल कलाम यांची पुण्यतिथी, जाणून घ्या, फारसे परिचित नसलेले गुण
- Dr APJ Abdul Kalam : डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची आज जयंती; त्यांचे 10 विचार जाणून घ्या