हैदराबाद : केवळ पुढच्या पिढीतील शास्त्रज्ञ अभियंते आणि नवोदितांनाच नव्हे तर शालेय विद्यार्थी आणि सामान्यतः देशातील लोकांनाही प्रेरणा देण्याच्या उद्देशानं, इस्रोने इस्रोच्या अधिकृत वेबसाईटसह विविध प्लॅटफॉर्मद्वारे या लँडिंगचं थेट कव्हरेज उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली आहे. या ऐतिहासिक क्षणात सक्रियपणे सहभागी होण्यासाठी अवकाश संस्थेनं देशभरातील शाळा आणि शैक्षणिक संस्थांना आमंत्रणही दिलंय. इस्रोने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग साध्य करण्यासाठी तयार असलेल्या चंद्रयान-3 मोहिमेसह भारताच्या अंतराळ संशोधनाने एक उल्लेखनीय टप्पा गाठलायं. हे यश भारतीय विज्ञान, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि उद्योगासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, जे आपल्या देशाच्या अवकाश संशोधनातील प्रगतीचे प्रतीक आहे.
अनेक प्लॅटफॉर्मवर उपलब्ध :23 ऑगस्ट 2023 रोजी 17:27 वाजता होणार्या या ऐतिहासिक घटनेचे थेट प्रक्षेपण केले जाईल. लाइव्ह कव्हरेज ISRO वेबसाइट, यूट्यूब, फेसबूक आणि डीडी नॅशनल टीव्ही चॅनेल यासह अनेक प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असेल, असं निवेदनात म्हटलंय. चंद्रयान-३ चे सॉफ्ट लँडिंग हा एक महत्त्वाचा क्षण आहे जो केवळ उत्सुकता वाढवतो असं नाही तर आपल्या तरुणांच्या मनात शोध घेण्याची उत्कट इच्छा देखील जागृत करतो. आम्ही एकत्रितपणे भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या पराक्रमाचा उत्सव साजरा करतो तेव्हा ते अभिमान आणि एकतेची गहन भावना निर्माण करतं. हे वैज्ञानिक चौकसता आणि नावीन्यपूर्ण वातावरणाला चालना देण्यास हातभार लावेल, असं निवेदनात म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्थांना या ऐतिहासिक कार्यक्रमात सक्रिय भूमिका बजावण्यासाठी आमंत्रित करण्यात आलंय. आपल्या विद्यार्थ्यांमध्ये आणि प्राध्यापकांमध्ये या कार्यक्रमाची सक्रियपणे प्रसिद्धी करण्यासाठी आणि संस्थेच्या आवारातच चंद्रयान 3 सॉफ्ट लँडिंगचे थेट प्रसारण आयोजित करण्यासाठी संस्थांना आमंत्रित केलंय.