चेन्नई :भारतीय अंतराळ संस्थेने मेघा ट्रॉपिक्स -१ हा हवामान उपग्रह २०११ ला फ्रेंच स्पेस एजन्सी सीएनईएसच्या ( CNES ) मदतीने लाँच केला होता. तीन वर्षाच्या कालावधीसाठी लाँच केलेल्या या उपग्रहाने हवामान विभागाची अचूक माहिती पुरवली होती. मात्र त्यानंतर या उपग्रहाला डीकमीशन करण्यात आले होते. आता मात्र इस्त्रो फ्रेंच स्पेस एजन्सी सीएनईएसच्या मदतीने पुन्हा हा उपग्रह नियंत्रित पद्धतीने प्रशांत महासागरातील निर्जन स्थळावर आणणार आहे. मंगळवारी ७ मार्चला या मेघा-ट्रॉपिक्स-1 (MT1) हा उपग्रह खाली आणण्यात येणार असल्याची माहिती इस्त्रोच्या वतीने देण्यात आली आहे.
तीन वर्षाचा होता उपग्रहाचा कालावधी : भारतीय अंतराळ संस्थेने फ्रेंच स्पेस एजन्सी सीएनईएसच्या मदतीने मेघा ट्रॉपिक्स-1 (MT1) हा उपग्रह प्रक्षेपित केला होता. 12 ऑक्टोबर 2011 ला उष्णकटीबंधातील हवामानाच्या अभ्यासासाठी इस्रो आणि फ्रेंच अंतराळ संस्था असलेल्या सीएनईएस यांच्या संयुक्त उपक्रमातून हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला. या उपग्रहाचा मिशन कालावधी तीन वर्षांचा होता. मात्र तरी या उपग्रहाने 2021 पर्यंत प्रादेशिक आणि जागतिक हवामानाबाबतची अचूक माहिती इस्त्रोला पुरवली होती.
एक हजार किलो वजनाचा आहे उपग्रह : मेघा ट्रॉपिक्स-1 (MT1) हा उपग्रह हा लो अर्थ ऑर्बिट या प्रकारातील होता. त्याचे वजन १ हजार किलो आहे. त्याचा परिभ्रमण काळ ८६७ किमी उंचीवर १०० वर्षापेक्षा जास्त असल्याचेही यावेळी इस्त्रोच्या वतीने नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे प्रशांत महासागरात त्याला नियंत्रित करून निर्जनस्थळी नेण्यात येणार असल्याचेही इस्त्रोने स्पष्ट केले आहे. मेघा ट्रॉपिक्स-1 (MT1) हा उपग्रह संयुक्त राष्ट्रसंघाच्या मार्गदर्शक तत्वानुसार रद्द करण्यात आला होता. त्यांच्या मार्गदर्शक तत्वानुसारच त्याचे नियंत्रण करुन कमी अपघाताचा धोका असलेल्या प्रशांत महासागरात त्याला ब्रेक अप करण्यात येणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे.
उपग्रहात आहे १२५ किलो इंधन : इस्त्रोने रद्द केलेला मेघा ट्रॉपिक्स-1 (MT1) हा उपग्रह नियंत्रित करुन प्रशांत महासागरात आणण्यात येणार आहे. त्यामुळे प्रशांत महासागरात अपघाताचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो. या उपग्रहात अद्यापही १२५ किलो इंधन शिल्लक आहे. त्यामुळे धोक्याची शक्यता आणखी वाढली आहे. मोठ्या उपग्रहाची बॉडी एरोथर्मल फ्रॅगमेंटेशनमध्ये टिकून राहण्याची शक्यता असते. त्यांना नियंत्रित रिएंट्रीमधून जावे लागत असल्यामुळे अपघाताचा धोका असतो. मात्र असे उपग्रह शेवटच्या वेळी नियंत्रित रिएन्ट्री करण्यासाठी डिझाइन केलेले असल्याचे इस्रोने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा - Laser Treatments Prevent Skin Cancer : त्वचेचा कर्करोग टाळण्यास लेझर उपचाराची होते मदत : अभ्यासातून झाले स्पष्ट