गोरखपूर : उत्तर प्रदेशाच्या गोरखपूर येथील आयटीएम अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एक स्मार्ट वायरलेस अँटी-सुसाईड सिलिंग फॅन रॉड शोधून काढला आहे. याची विशेषता म्हणजे कुणीही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यास तो अलर्ट करेल. आयटीएम अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या बी. टेक कॉम्प्युटर सायन्स प्रथम वर्षाच्या अविनाश, वरुण, अनुराग पांडे व अनुप्रश गौतम या चार विद्यार्थ्यांनी संयुक्तपणे याला बनवले आहे. पंख्याला लटकून होणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी हे उपकरण उपयुक्त ठरणार आहे.
फक्त 750 रुपये खर्चात बनवले :अविनाश याने सांगितले की, हे उपकरण ट्रान्समीटर आणि सेन्सरवर आधारित आहे. त्याने सांगितले की, आत्महत्येविरोधी पंख्यामध्ये बसवलेला ट्रान्समीटर सेन्सर स्प्रिंग 30 किलोपेक्षा जास्त वजनाचा दाब आल्यावर खाली येतो आणि अलार्मसह रूम नंबरची माहिती 100 मीटर दूर ठेवलेल्या रिसीव्हरला पाठवतो. हा रिसीव्हर हॉटेलच्या गेस्ट हाऊसच्या कर्मचाऱ्यांजवळ बसवण्यात येणार आहे, जेणेकरून अशा घटनांना वेळीच आळा बसेल. तेथे उपस्थित कर्मचारी घटनास्थळी पोहोचून पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे प्राण वाचवू शकतात. ते बनवण्यासाठी एक महिना लागला असून 750 रुपये खर्च आला आहे.
वायरलेस तंत्रज्ञानावर आधारित आहे : वरुणने सांगितले की, कोणत्याही हॉटेलच्या रिसेप्शनमध्ये कंट्रोल पॅनल असेल. उदाहरणार्थ, कोणत्याही खोलीत घटना घडल्यास थेट त्या खोलीत पोहोचून घटना थांबवता येते. हे वायरलेस तंत्रज्ञानावर आधारित आहे. प्रकल्पासाठी हाय फ्रिक्वेन्सी ट्रान्समीटर, रिसीव्हर, फॅन रॉड 9 व्होल्ट बॅटरी, अलार्म इंडिकेटरचा वापर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.