एकविसाव्या शतकातील दुसऱ्या दशकाचा शेवट होत असतानाच संपूर्ण जगाला कोरोना विषाणूच्या अभूतपूर्व संकटाने हादरा दिला. कोरोनाच्या या हादऱ्याचा संपूर्ण जगाला मोठा फटका बसला. सर्वच देशांनी आपापल्या पद्धतीने कोरोनाशी लढा देत त्यावर मात करण्याचे प्रयत्न केले. भारतानेही कोरोनाचा प्रभावीपणे सामना केला. भारताच्या या प्रभावी लढ्याचे जगभरातूनही मोठे कौतुक करण्यात आले.
वेगवेगळ्या आघाड्यांवर भारताचा लढा
कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी भारत सरकारने सुरूवातीपासून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या. कोरोना संकटाचा सामना करताना वेगवेगळ्या आघाड्यांवर भारत सरकारला लढा द्यावा लागला. देशाच्या आरोग्याची काळजी घेण्यासोबतच अर्थव्यवस्था सावरणे हे मुख्य आव्हान सरकारसमोर होते. सुरूवातीच्या काळात कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या उद्देशाने लॉकडाऊन लावणे, त्यानंतर कोरोना रुग्ण आढळलेल्या भागात कन्टेन्मेन्ट झोन जाहीर करणे, आरोग्य यंत्रणा मजबूत करणे असे उपाय सरकारने केले. कोरोनाचा प्रसार होत असताना मार्च महिन्यात पहिल्या टप्प्यात 21 दिवसांचा देशव्यापी लॉकडाऊन लावण्यात आला. त्यानंतर कोरोनाच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर यात सातत्याने वाढ करण्यात आली. लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेला मात्र मोठा फटका बसला. या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्था सावरण्यासाठी तसेच नागरिकांना या संकटात आर्थिक आधार देण्यासाठी वेगवेगळे उपाय सरकारने केले.
आर्थिक आघाडीवर मदतीसाठी योजनांची घोषणा
अन्न सुरक्षा आणि आर्थिक मदतीसाठी पंतप्रधान गरीब कल्याण योजना जाहीर करण्यात आली. 150 अब्जांचा आरोग्य निधी तातडीने देण्यात आला. मनरेगाच्या रोजंदारीत वाढ करण्यात आली. गरीब कल्याण रोजगार अभियान चालविण्यात आले. राज्यांना आर्थिक मदतीसाठी महत्वाच्या सुधारणा करण्यात आल्या. आत्मनिर्भर भारत योजनेची घोषणा केंद्र सरकारने केली. याअंतर्गत लघू व मध्यम उद्योगांना मदतीचे धोरण अवलंबण्यात आले. राज्यांना मदत देता येईल या दृष्टीने उपाययोजना करण्यात आल्या. याशिवाय सामान्यांना दिलासा देण्यासाठी लोन मोरॅटोरीयमची घोषणा केंद्र सरकारने केली. रेपो आणि रिव्हर्स रेपो दरात कपात करण्यात आली. बँकांची कर्जमर्यादा वाढविण्यात आली. कृषी, एमएसएमई, व्यापार, लघू व मध्य उद्योग तसेच संरक्षण क्षेत्रातही वेगवेगळ्या सुधारणा सरकारने केल्या.
राज्यांच्या मदतीसाठी उचलली अनेक पावले
कोरोनाच्या आव्हानात्मक परिस्थितीत राज्यांच्या मदतीसाठी केंद्राने अनेक पावले उचलली.
- आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत कर्जमर्यादा वाढविली
- जीएसडीपीच्या दोन टक्के कर्जमर्यादा केंद्राने वाढविली. याचे मूल्य 4.27 लाख कोटींच्या आसपास आहे.
- वाढविलेल्या 2 टक्के कर्जमर्यादेपैकी 0.5 टक्के कर्जाचा पहिला हफ्ता घेण्याची सुट सर्व राज्यांना देण्यात आली.
- वाढविलेल्या कर्जमर्यादेचा 1 टक्क्यांचा दुसरा हफ्ता मिळविण्यासाठी चार सुधारणांच्या अंमलबजावणीचा निकष केंद्राने ठरवून दिला. या प्रत्येक सुधारणेसाठी 0.25 टक्के इतकी कर्जमर्यादा राज्यांना वाढवून मिळणार आहे. या चार सुधारणा पुढील प्रमणे आहेत.
- वन नेशन वन रेशन कार्ड प्रणाली लागू करणे
- व्यापार सरलीकरण सुधारणा लागू करणे
- शहरी स्थानिक प्रशासनातील सुधारणा
- ऊर्जा क्षेत्रातील सुधारणा
वरीलपैकी किमान तीन सुधारणा लागू केल्यानंतर राज्यांना शेवटचा 0.5 टक्के कर्जाचा हफ्ता घेता येणार आहे. या निकषांनुसार 30 डिसेंबर 2020 पर्यंत 10 राज्यांनी वन नेशन वन रेशन कार्ड प्रणाली लागू केली. 7 राज्यांनी व्यापार सरलीकरण, 2 राज्यांनी शहरी स्थानिक प्रशासनातील सुधारणा लागू केल्या. या सुधारणा लागू करणारी राज्ये योजनेनुसार 51,682 कोटींचे कर्ज घेण्यास पात्र ठरली आहेत.
राज्यांना जीएसटी महसूलातील नुकसान भरपाई
- 2020-21 या आर्थिक वर्षात जीएसटी महसूलातील नुकसानीची भरपाई म्हणून केंद्राने एकूण नुकसानीइतके कर्ज घेण्याची मुभा राज्यांना दिली आहे. राज्ये हे कर्ज अर्थमंत्रालयाने उपलब्ध करून दिलेल्या स्पेशल विंडोच्या माध्यमातून घेऊ शकतात. किंवा बाजारातून कर्ज घेऊ शकतात.
- सर्व 28 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांनी पहिला पर्याय निवडत अर्थमंत्रालयाच्या सुविधेतून कर्ज घेण्याला पसंती दिली.
- या सुविधेच्या माध्यमातून 23 ऑक्टोबर 2020 पर्यंत 1.1 लाख कोटींची मागणी नोंदविण्यात आली आणि केंद्र सरकारने राज्यांच्या वतीने पाच हफ्त्यांमध्ये 54 हजार कोटींची उचल घेत ही रक्कम राज्यांना वितरीत केली.
- या पर्यायानुसार राज्यांना त्यांच्या एकूण जीडीपीच्या 0.5 टक्के कर्ज घेण्याची विनाअट मुभा मिळणार आहे.
- या कर्जाची अंदाजित रक्कम 1.07 लाख कोटींच्या घरात आहे.
- याशिवाय हा पर्याय निवडणाऱ्या राज्यांना 2020-21 मध्ये न वापरलेल्या अतिरिक्त कर्जाची कमाल मर्यादा पुढील वर्षात वापरण्याची मुभाही मिळणार आहे.