नवी दिल्ली - कोविड १९ च्या संकटातून बाहेर आल्यावर परिवहन क्षेत्रातील परिवर्तन घडवण्यासाठी गुंतवणूक केल्यास लक्षावधी नवीन रोजगार निर्माण होतील आणि देशांना हरित, सुदृढ अर्थव्यवस्थांकडे घेऊन जातील, असे आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या युरोपसाठीच्या आर्थिक आयोगाच्या अहवालात म्हटले आहे.
या अहवालात असे आढळले आहे की जगभरात १०० कोटी रोजगार निर्माण होतील आणि त्यापैकी ५० टक्के वाहने जर विद्युत उर्जेवर चालणारी असतील तर त्यापैकी २० कोटी ९० लाख रोजगार यूएनईसीईच्या प्रदेशात तयार होतील. याव्यतिरिक्त, यूएनईसीई देशांनी सार्वजनिक परिवहन क्षेत्रात आपली गुंतवणूक दुप्पट केली तर त्या प्रदेशात २० लाख २५ हजार आणि जगभरात ५० लाख नवीन रोजगार निर्माण होतील.
परिवहन क्षेत्राच्या बाहेर रोजगार निर्मितीला समर्थन देणार्या घटकांमध्ये तेलावरील खर्च कमी झाल्याच्या परिणामी वस्तु आणि सेवांवर वाढीव खर्च आणि उर्जा उत्पादन आणि वापराशी संबंधित उपाययोजनांचा समावेश आहे. विशेषतः नवीकरणीय स्त्रोतांपासून विज आली असेल तर खासगी प्रवासी आणि मालवाहतुकीचे विद्युतीकरण केल्यासही रोजगार निर्माण होतील.
अहवालात असेही म्हटले आहे की, असे बदल केल्याने निर्माण झालेल्या हरित परिवहन व्यवस्थेच्या परिणामी हरित वायु उत्सर्जनाचे प्रमाण कमी होईल, हवा आणि ध्वनि प्रदूषणात घट येईल आणि वाहतुकीची कोंडी कमी होऊन रस्त्यावरील अपघातांची संख्याही कमी होणार आहे.
परिवहन क्षेत्र हरित बनवण्याशी संलग्न रोजगाराच्या संधींचा जास्तीत जास्त लाभ उठवण्यासाठी, सर्वसमावेशक धोरणांच्या अमलबजावणीची शिफारस अहवालाने केली आहे. यात कौशल्य विकास, सामाजिक संरक्षण, कामगार बाजारपेठ धोरणे आणि कामाच्या ठिकाणी सामाजिक संवाद आणि मूलभूत हक्कांना चालना यांचा समावेश आहे.