हैदराबाद -जग कोरोना विषाणूच्या संकटाने ग्रस्त असताना आरोग्य यंत्रणा कमकुवत आणि विस्कळीत झाली आहे. त्यामुळे ही परिस्थिती कायम राहिल्यास ज्या रोगांपासून बचाव करता येणे शक्य आहे त्यावर नियंत्रण मिळविणे अशक्य होईल. परिणामी पुढील सहा महिन्यात प्रतिदिन ६ हजारांपेक्षा जास्त मुलांचे मृत्यू होऊ शकतात असा इशारा द युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंडाने (युनिसेफ) दिला आहे. जॉन्स हॉपकिन्स ब्लूमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ येथील संशोधकांनी केलेल्या विश्लेषणावर आधारित मुलांचे मृत्यू होऊ शकतात असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यासंदर्भातील माहिती लॅन्सेट ग्लोबल हेल्थ जर्नलमध्ये बुधवारी प्रकाशित करण्यात आली आहे.
जगभरातील कमी-मध्यम-उत्पन्न-असलेल्या ११८ प्रदेशांतील तीन महत्वपूर्ण गोष्टी विचारात घेऊन हे मूल्यमापन करण्यात आले आहे. त्या आधारे मुलांच्या सुदृढतेसाठी आवश्यक सेवांमध्ये खंड पडल्याने आणि दुसरीकडे नवजात मुलांच्या जन्माचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन पाच वर्षांखालील १२ लाखांपेक्षा जास्त मुलांचे जीव धोक्यात असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. कोविड-१९ मुळे लहान मुलांच्या हक्कावर आपत्ती आली आहे असे युनिसेफ कॅनडाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड मॉर्ले यांनी म्हटले आहे. लहान मुले कोविड १९ मुळे आजारी पडण्याची शक्यता फारच कमी असते मात्र तसा छुपा धोका संभवतो. त्यामुळे मुलांचे लहानपण कोरोना साथीमुळे लघु आणि दीर्घकालीन पातळीवर प्रभावित झाले आहे.
मागील दशकभरातील सातत्यशील प्रयत्नांमुळे पाच वर्षांखालील मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यात जे यश मिळविले आहे त्याला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. या अगोदर देखील या ११८ प्रदेशातील पाच वर्षांखालील मृत्यूचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे कोविड १९ मुळे होणारे मृत्यू आणि स्थानिक पातळीवरील बाल हक्कांची पूर्तता न झाल्यामुळे होणारे मृत्यू मिळून हा आकडा २५ लाखांपर्यंत जाण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
अतिशय वाईट परिस्थिती ओढवल्यास, मागील अनेक वर्षात पहिल्यांदाच पाच वर्षांखालील मुलांच्या मृत्यूंचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढू शकते असे युनिसेफचे शासकीय संचालक हेनरीटा फोर यांनी म्हटले आहे. "कोरोनाशी संघर्ष करत असताना आपण माता व नवजात बालकांना धोका निर्माण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर आपल्याला माता आणि बालकांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यात यश मिळाले आहे, त्याला धोका निर्माण होऊ नये," असे फोर म्हणाले.