महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / opinion

covid-19 : ट्रम्प यांचे काय चुकले..? - ट्रम्प यांचे काय चुकले

त्यांच्याकडे सामर्थ्य आणि शक्ती आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत जागतिक स्तरावर ते अग्रस्थानी आहेत. तरीही एका सुक्ष्म जीवाने संपुर्ण देशाला हादरवून सोडले आहे. महासत्ता प्रथमच एवढा संघर्ष करताना दिसत आहे. महामारीची तयारी दर्शविणाऱ्या निर्देशांकात 83.5 गुणांसह पहिल्या क्रमांकावर अमेरिकेस कोविड-19 चा सामना करताना कमालीचे अपयश आले आहे.

How Trump got it all wrong!
covid-19 : ट्रम्प यांचे काय चुकले..?

By

Published : Apr 13, 2020, 6:19 PM IST

महामारीबाबत मोठ्या प्रमाणात संकेत आणि इशारे मिळूनदेखील, अमेरिकेला प्रसार नियंत्रणात आणता आला नाही. या निराशाजनक परिस्थितीमागे सावधगिरीच्या उपायांचा अभाव आणि त्याकडे दुर्लक्ष, आरोग्यसेवा यंत्रणांवर अतिरिक्त आत्मविश्वास, आर्थिक मंदीची भीती यासारखी कारणे आहेत, असे मत विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. स्वतःला युद्धकाळातील राष्ट्राध्यक्ष म्हणवणाऱ्या ट्रम्प यांनी विषाणु उद्रेकाच्या सुरुवातीच्या काही दिवसांमधील शास्त्रीय पुरावे आणि तथ्यांकडे दुर्लक्ष केले. त्यांच्या निर्जीव उपायांमुळे अमेरिका मोठ्या संकटात सापडली आहे.

या संसर्गजन्य रोगामुळे अनेक समृद्ध आणि अत्याधुनिक देश डळमळीत झाले आहेत. अमेरिका, इटली, स्पेन आणि फ्रान्स या देशांमध्ये सर्वाधिक परिणाम झाला आहे. अमेरिकन सत्तेतील उतरंडीमधील ढिलेपणा, चाचणी किट्स आणि उपकरणांचा तुटवडा, फेडरल आणि राज्य सरकारांमध्ये समन्वयाचा अभाव या मुख्य समस्या झाल्या आहेत. दक्षिण कोरिआत प्रत्येक 10,00,000 लोकसंख्येमागे 8,000 चाचण्या करण्यात आल्या, तर अमेरिकेत शेवटचा आठवडा संपण्यापुर्वी केवळ 3,300 चाचण्या झाल्या. या विषाणुशी लढा देण्यासाठी अद्यापही देशभरात एकसंध धोरण नाही. अमेरिकेतील काही राज्यांनी अजूनही लॉकडाऊन जाहीर केलेले नाही. अनियंत्रित गर्दीचा परिणाम म्हणून मोठ्या प्रमाणात विषाणूचा उद्रेक झाला आहे. फ्लोरिडामध्ये अगदी मागील आठवड्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले.

जेव्हा महामारीने लोकांचे जीव घेण्यास सुरुवात केली, ट्रम्प सरकारने युद्ध पातळीवर काही उपाययोजना राबविल्या. आर्थिक उत्तेजन पॅकेज जाहीर करण्याबरोबरच, सरकारने मास्क, व्हेंटिलेटर्स आणि औषधांची आयात करण्यास सुरुवात केली. सैन्यदलाची नियुक्ती करण्यात आली. विषाणूचे केंद्रबिंदू असलेल्या न्युयॉर्कसारख्या ठिकाणी 3,000 लष्करी डॉक्टर्सची पाठवणी करण्यात आली. लष्करी अभियंत्यांनी न्युयॉर्कमधील जॅव्हिट्स कन्व्हेन्शन सेंटरचे एका भव्य रुग्णालयात रुपांतर केले. एकुण 18 राज्यांमध्ये 22 तात्पुरत्या रुग्णालयांची उभारणी केली जात आहे. रुग्णालयांमध्ये चाचण्यांचे प्रमाण वाढले आहे. सरकारने एकूण 1.17 कोटी एन95 मास्क, 2.65 कोटी सर्जिकल मास्क, 23 लाख फेस मास्क, 44 लाख सर्जिकल गाऊन्स आणि 2.26 कोटी हँडग्लोव्हसचा पुरवठा केल्याचा दावा केला आहे. एकूण 20 लष्करी विमानांच्या साह्याने विविध देशांमधून या साहित्याची आयात करण्यात आली आहे.

या विषाणुसंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने आमची दिशाभुल केली आहे, असा आरोप ट्रम्प करीत आहेत. मात्र, वैद्यकीय तज्ज्ञांना त्यांनी कधीही जुमानले नाही, अशी टीका होत आहे. अमेरिकेत कोविड-19 चे पहिले प्रकरण 21 जानेवारी रोजी आढळून आले होते. चीनने विषाणूचा केंद्रबिंदू वुहान शहरात 23 जानेवारीला लॉकडाऊन केले. दुसऱ्या दिवशी ट्रम्प यांनी असा दावा केला की, अमेरिकेतील परिस्थिती नियंत्रणात आहे. त्यानंतर 28 फेब्रुवारी रोजी अमेरिकेत कोविड-19 मुळे मुळे होणाऱ्या पहिल्या मृत्यूची नोंद झाली. हे सामुदायिक संक्रमणाचे प्रकरण असल्याने मृत्यूंमुळे धोक्याची घंटा वाजविली. त्याच आठवड्यात ट्रम्प यांनी घोषणा केली की, कोरोना विषाणू चमत्कारिक पद्धतीने अदृश्य होईल. त्यानंतर 6 मार्च रोजी इम्पिरिअल कॉलेज, लंडन येथील साथीच्या रोगांच्या विशेषज्ञांनी असा इशारा दिला की, जर सरकारने वेळेत कृती केली नाही, तर अमेरिकेतील 81 टक्के लोकसंख्येस विषाणूचा संसर्ग होईल. तरीही ट्रम्प असे सांगत राहिले की, देश सुरक्षित आहे.

ट्रम्प यांच्या टास्क फोर्समधील कोरोना विषाणू प्रतिसाद समन्वयक डेबोराह बर्क्स यांनी 16 मार्च रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, एकावेळी 10 पेक्षा अधिक लोकांनी एकत्र येऊ नये. परिषदेत त्यांच्या शेजारी उभे असलेल्या ट्रम्प यांनी त्यांच्या मतांना विरोध केला. ते म्हणाले की, अनेक अमेरिकी राज्यांमध्ये विषाणूचे अस्तित्व आढळलेले नाही. काही दिवसांनी प्रकरणे आणि मृत्यूंचे आकडे गगनास भिडल्यानंतर, त्यांनी घोषणा केली की आम्ही जास्तीत जास्त लोकांची चाचणी करु. परंतु त्यांची पुर्वतयारी नसल्याने, चाचणी किट्सचा तुटवडा होता.

2018 साली ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य सुरक्षा आणि संरक्षणासाठी व्हाईट हाऊसमधील राष्ट्रीय सुरक्षा समिती संचालनालय विसर्जित केले होते. आगामी रोगाच्या उद्रेकाची तयारी करण्यासाठी अमेरिकी सरकारच्या अधिकारक्षेत्र आणि संसाधनांमध्ये जे शक्य आहे, ते करण्याचे संचलनालयाचे उद्दिष्ट होते. जेव्हा ट्रम्प यांनी संचलनालय विसर्जित करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा अधिकाऱ्यांना धक्का बसला होता. 1999 साली स्थापन करण्यात आलेला सार्वजनिक आरोग्य निधी दीर्घकाळापासून रिक्त आहे. एक वेळ अशी आली की, सरकारने सांगितले की, या निधीतून राज्यांना औषधांचा पुरवठा करता येणार नाही. जेव्हा ट्रम्प यांनी 13 मार्च रोजी कोविड-19 ही आरोग्य आणीबाणी जाहीर केली तेव्हा राज्यांना स्वतःच औषधांची खरेदी करण्यास सांगण्यात आले. ट्रम्प सरकारने हा निधी अमेरिका आरोग्य आणि मनुष्य सेवा विभागाशी जोडला. या निर्णयामुळे आणीबाणी निधीचे उद्दिष्ट पराभूत होईल, अशी टीका झाली.

अमेरिकेतील काही प्रमुख व्यक्तींनी केलेले ट्विट्सः

  • या अदृश्य शत्रूबाबत बरीच माहिती मिळत आहे. हा कणखर आणि हुशार आहे, परंतु आम्ही त्यापेक्षा अधिक कणखर आणि हुशार आहोत! - डोनाल्ड ट्रम्प
  • ही अमेरिकेतील या शतकातील सर्वात वाईट सार्वजनिक आरोग्य आपत्ती समजली जाईल. या आपत्तीचे मूळ कारण हे, कसा आणि कुठे रोगाचा प्रसार होत होता हे समजून घेण्याची तयारीचा अभाव आहे. - एरिक टोपोल, अमेरिकी ह्रदयरोगतज्ज्ञ आणि अनुवंशशास्त्रज्ञ
  • ज्या देशांनी धोका ओळखला आणि त्याग करण्याची तयारी ठेवली त्यांना यातून कमी नुकसान झाले. याबाबतीत अमेरिका अपयशी ठरली आहे. महामारीसंदर्भात कृती करण्यापुर्वी अमेरिकी सरकारने 6 ते 8 आठवडे वाट पाहिली - जेरेमी कॉन्डेन्डीक, सिनिअर पॉलिसी फेलो, सेंटर फॉर ग्लोबल डेव्हलपमेंट
  • ट्रम्प यांनी त्यांच्या काही समर्थकांना हवामान बदलांसंदर्भात खात्री पटवून दिली आहे, म्हणूनच ते नैसर्गिकपणे कोणत्याही सल्ल्याचा अशा पद्धतीने विचार करत आहेत, की कोरोना विषाणूची भीतीचादेखील बागुलबुवा करण्यात आला आहे. - नाओमी ऑरेस्केस, विज्ञान इतिहासकार, हार्वर्ड विद्यापीठ

हेही वाचा :अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या साडेपाच लाखांवर, ट्रम्प यांच्या एका मित्राचाही मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details