दरवर्षी साधारणतः या काळात शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पीकांसाठी बाजारपेठेत विविध संकटांचा सामना करावा लागतो. यावर्षीही कोवीड-१९ मुळे शेतकर्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. क्रिसिल (संशोधन आणि धोरण सल्लागार सेवा, आणि मुल्यांकन करणारी भारतीय विश्लेषक कंपनी) कंपनीच्या अभ्यासानुसार सध्या शेतकरी समुदायावर देशव्यापी संकट ओढावले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी गहू आणि मोहरीच्या उत्पादनात ९० टक्के घट झाली आहे. तर गहू लागवडीसाठी प्रसिद्ध असलेली दोन प्रमुख राज्ये पंजाब आणि हरियाणा येथे अद्याप गहू काढणीची प्रक्रिया सुरू झालेली नाही.
या स्थिरतेची चार प्रमुख कारणे क्रिसिल कंपनीच्या अभ्यासात समोर आली आहेत. त्यांच्या अभ्यासानुसार, यावर्षी रब्बी हंगामात झालेला विलंब, लॉकडाऊन काळात शेतमजुरांची असलेली कमतरता, माल वाहतुकीची गैरसोय आणि बाजारपेठत निर्माण झालेला सुस्तपणा या चार कारणांमुळे शेतकरी बिकट परिस्थितीत सापडला आहे. त्यांनी पिकवलेला माल खरेदी करण्यासाठी कोणताही खरेदीदार किंवा व्यापारी तयार नसल्यामुळे बहुतांश शेतकरी अस्वस्थ झाले आहेत. तर दुसरीकडे फळ आणि भाजीपाला उत्पादकांना याचा सर्वाधिक फटका बसला असून वाहतुकीच्या गैरसोयीमुळे त्याचा माल तसाच पडुन राहीला आहे. तर काही शेतकरी त्यांनी पीकवलेला हजारो किलो माल विनामूल्य वाटून टाकत आहेत, यामध्ये विशेषतः द्राक्षे आणि मोसंबी पीकाचा समावेश आहे. काहीजण तर आपल्या शेतात जनावरे चरण्यासाठी सोडत आहेत. या उन्हाळ्यात बक्कळ नफा मिळवण्याची आशा बाळगणारे आंबा उत्पादक शेतकरी आंतरराज्यीय सीमा वाहतुकीसाठी बंद असल्याने मोठ्या संकटात सापडून अस्वस्थ झाला आहे. अत्युत्तम पुरवठा आणि वितरण प्रणाली असणारा भारतासारखा शेतीप्रधान देश अशा संकटात सापडला आहे, यापेक्षा दुर्दैवी काय असू शकते?
यावर्षी तेलंगाणा राज्यात १ कोटी टन भाताचे भरघोस उत्पादन होऊ शकते. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या अन्नधान्याचा प्रत्येक कण सरकार ग्रामीण कृषी व्यवसाय केंद्रातून खरेदी करेल, असे आश्वासन तेलंगाना राज्याचे मुख्यमंत्री केसीआर यांनी शेतकऱ्यांना दिले. त्याचबरोबर त्यांनी मका व इतर रब्बी हंगामातील पीक उत्पादन गोळा करण्यासाठी २८ हजार कोटी रुपयांच्या निधीची केलेली तरतुद, ही एक कौतुकास्पद बाब आहे. प्रत्येक राज्याने पुढाकार घेऊन अशा प्रकारचं पाऊल उचलणं अपेक्षित आहे. तेलंगाणा सरकारने एवढा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊनही जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे शेतकर्यांचे जीवनमान दयनीय बनत चालले आहे. संस्थात्मक पाठबळ किंवा योग्य मोबदला मिळत नसल्याने अनेक राज्यांतील शेतकरीवर्ग या वर्षाच्या कापणीच्या आशा गमावत आहे.