हैदराबाद -फोन नंबर, आधार क्रमांक, पॅन कार्ड, बँक खात्याचे तपशील, पगार आणि आयकर भरणे या सर्व गोष्टी आजच्या घडीला नागरिकांसाठी महत्वाच्या आहेत. त्यामुळे त्यासाठी सुरक्षाही तितकीच महत्वाची आहे. सायबर गुन्हेगार हे नागरिकांची संवेदनशील माहिती चोरून त्यातून फायदा उठवण्याच्या अनेक घटना अलीकडच्या काळात उघडकीस आल्या आहेत. यामुळे नागरिकांच्या वैयक्तिक गोपनीयतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वैयक्तिक गोपनीयता हा विषय सर्वोच्च न्यायालयाने नागरिकांचा मूलभूत अधिकार म्हणून मान्य केला आहे.
नागरिकांचा वैयक्तिक डिजिटल डेटा जतन करून त्यांचा सन्मान राखण्यासाठी देशात सध्या सक्षम कायद्याचा अभाव आहे. वैयक्तिक माहिती संरक्षण कायद्याच्या मसुद्यावर पाच वर्षांपासून चर्चा सुरू आहे. केंद्राने नवीनतम 'डिजिटल डेटा प्रोटेक्शन (डीडीपी) विधेयकाचा मसुदा तयार केला होता आणि त्यावर गेल्या वर्षी सूचना आणि हरकती देखील मागवल्या होत्या.
डीडीपी या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतीच मंजुरी दिली आहे. त्यामुळे हे विधेयक आगामी पावसाळी अधिवेशनात संसदेद्वारे मंजूर होऊ शकते. कायद्याच्या मसुद्यानुसार, डेटा चोरी रोखण्यात अपयशी ठरणाऱ्या कंपन्यांना 250 कोटी रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. मात्र, राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली सरकारी संस्थांना सूट देणार्या नियमांना तीव्र टीकेला सामोरे जावे लागले आहे.
'डीडीपी' विधेयकामुळे माहिती अधिकार कायदा कमकुवत होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त करण्यात आली आहे. वाद मिटवण्याची जबाबदारी असलेल्या 'डेटा प्रोटेक्शन बोर्ड'च्या स्वातंत्र्याबाबतही शंका आहेत. अहवाल असे सूचित करतात की केंद्र सार्वमताच्या वेळी उपस्थित झालेल्या चिंतेकडे पुरेसे लक्ष न देता डीडीपी विधेयक कायद्यात मंजूर करण्याची तयारी करत आहे. याबाबतच्या चिंता आता अनेकांनी व्यक्त केल्या आहेत.