नवी दिल्ली :शक्तिशाली ब्रम्हपुत्रा नदीखालून १५ किलोमीटर लांबीचा चार पदरी बोगदा खणण्याची महत्वाकांक्षी प्रकल्प हा भारतासाठी गेमचेंजर ठरणार आहे. कारण संपूर्ण चिन या बोगद्यामुळे भारताच्या डावपेचात्मक क्षेपणास्त्रांच्या पल्ल्यात परिणामकारकरित्या येणार आहे आणि यात चिनचे सर्वात मोठे शहर तसेच जागतिक व्यापारी केंद्र असलेल्या शांघायचाही समावेश आहे. भारताच्या ईशान्येतील ब्रम्हपुत्रा नदीच्या दक्षिण किनाऱ्यावर चिनसाठी भारताने आपला संपूर्ण सामर्थ्यवान पारंपरिक आणि अण्वस्त्रक्षम क्षेपणास्त्र प्रणाली सज्ज ठेवली आहे. त्यांना उत्तरेतील राज्य अरूणाचल प्रदेशकडे सरकवल्याने जवळपास संपूर्ण चिन भारतीय क्षेपणास्त्रांच्या पल्ल्यात येणार आहे.
शिवाय, अरूणाचल प्रदेशच्या अत्यंत पर्वतीय आणि अवघड भूप्रदेशात अशा क्षेपणास्त्र प्रणाली तैनात केल्याने अधिक चांगल्या प्रकारे छद्म डावपेच आणि संरक्षण करण्यास भारतीय सेना सक्षम होईल. परंतु त्यासाठी, क्षेपणास्त्र प्रणालीची सहज नेआण करणे आणि लपवण्याची सुनिश्चिती करणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यावेळी डावपेचात्मक दृष्टिने ब्रम्हपुत्रा नदीतील बोगदा हा अत्यंत महत्वाची भूमिका बजावू शकतो. प्रस्तावित बोगदा नदीच्या दक्षिण किनार्यावरील नुमालीगढ ते उत्तर किनार्यावरील गोहपूर यांना जोडणारा असून तेथूनच अरूणाचल अगदी जवळ आहे.
क्षेपणास्त्र प्रणालीच्या हालचालीशिवाय, बोगद्यामुळे सैनिक आणि अवजड शस्त्रांसह युद्धसाहित्याची प्रत्यक्ष नियंत्रण रेषेकडे किंवा चिनला लागून असलेल्या वास्तविक सीमेकडे वाहतूक करणे सोपे जाणार असून सत्तासंतुलन बदलणारा ठरणार आहे. आणि ही हालचाल शत्रुराष्ट्राच्या नजरेस न पडता केली जाऊ शकणार आहे. स्त्रोतांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताचे आसामात लष्करी तळ असून तेथे अण्वस्त्रक्षम अग्नि २, अग्नि ३ आणि ब्रम्होस क्षेपणास्त्र प्रणाली तैनात आहे.
मध्यम पल्ल्याचे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र अग्नि २ चा मार्याचा पल्ला ३,५०० किलोमीटर इतका असून अग्नि ३ या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राचा मार्याचा पल्ला ५,००० किलोमीटर आहे. दुसरीकडे, ब्रम्होस हे सागरी क्षेपणास्त्र असून त्याचा पल्ला ३०० किलोमीटर आहे. या सर्व क्षेपणास्त्रांची रस्ते आणि रेल्वेसह विविध प्रकारच्या मंचांवरून प्रक्षेपण करण्याची क्षमता आहे. चिनने त्यांची किमान १०४ अण्वस्त्रक्षम क्षेपणास्त्रे तैनात केली असून त्यांची भारताच्या जवळपास दूरवरच्या कोपर्यापर्यंत मारा करण्याची क्षमता आहे. पीएलएच्या डावपेचात्मक रॉकेट फोर्सने तैनात केलेल्या दोन मुख्य अण्वस्त्रक्षम क्षेपणास्त्रांमध्ये डाँग फेंग २१ आणि डॉंग फेंग ३१ यांचा समावेश आहे. डीएफ २१ चा मार्याचा पल्ला २,००० किलोमीटर इतका आहे तर डीएफ ३१ चा पल्ला ७,००० किलोमीटर आहे आणि डीएफ ३१ एचा पल्ला तर ११,००० किलोमीटर आहे.
डीएफ २१च्या भारतकेंद्री क्षेपणास्त्र तळाची ठिकाणे उघ्युर स्वायत्त प्रदेशातील कोरला, झिंजियांग (बेस ५६) आणि युन्नान प्रांतातील जियानशुई (बेस ५३) ही आहेत. दुसरीकडे, क्विंघाय प्रांतातील लिंक्विंगकोऊ(बेस ५६)येथे डीएफ २१ आणि डीएफ ३१ तैनात केली आहेत. भारत सरकारने अलिकडेच बोगदा प्रकल्पाला तत्वतः मंजुरी दिली असून बोगद्यासाठी प्रस्तावाची विनंतीची जागतिक निविदेची प्रक्रिया १५ऑक्टोबर, २०१९ रोजीच पूर्ण झाली आहे. बोगद्याचे काम पूर्ण करण्याची मुदत २०२८पर्यंत दिली आहे. गेल्या वर्षी, सीमावर्ती रस्ते संघटनेने बोगदा प्रकल्पावर संसदीय समितीसमोर पॉवर पॉईंट सादरीकरणही दिले होते. अरूणाचल प्रदेश अत्यंत पर्वतीय प्रदेश असून तिबेट स्वायत्त प्रदेशाशी त्याची ११२६ किलोमीटर लांबीची सीमा आहे आणि भारताच्या ईशान्येतील सर्वात मोठे राज्य आहे. चिनने या राज्यावर दावा सांगितला आहे तसेच त्याला चिन दक्षिण तिबेट म्हणत असतो.
अगोदरच, ब्रम्हपुत्रा नदी तिच्या विशाल आकार आणि उग्र पूरस्थितीसाठी ओळखली जाते.तिच्यावर ६ पूल असून ते दक्षिण आसामला उत्तर आसामशी जोडतात, चिनशी युद्ध झाले तर मात्र प्रथम या पुलांनाच लक्ष्य केले जाईल.
- संजीव के बारूआ