नवी दिल्ली - पब्जी गेमची आवड असणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. पब्जी खरोखरच सुरू होणार असल्याची माहिती दक्षिण कोरियन कंपनी क्राफ्टोनने दिली आहे.
पब्जी भारतामध्ये येणार असल्याच्या अनेकदा निव्वळ अफवा ठरल्या आहेत. मात्र, आता खरोखर पब्जी देशात पुन्हा सुरू होणार आहे. पब्जीची मालकी असलेली कंपनी क्राफ्टोनने सोशल मीडियावर आणि वेबसाईटवर भारतामध्ये पब्जी येणार असल्याचे म्हटले आहे. मात्र, हा गेम पब्जी नव्हे तर बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया नावाने येणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा-गुरुग्राम : आयसीयूमध्ये मृत कोरोना रुग्णांना सोडून डॉक्टर फरार; सहा दिवसांनंतरही कारवाई नाही
काय म्हटले आहे कंपनीने?
पब्जीची मालकी असलेल्या क्राफ्टोन कंपनीने वैयक्तिक गोपनीयता आणि डाटा सुरक्षेसाठी सर्वोच्च प्राधान्य असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यासाठी भागीदारांबरोबर प्रत्येक टप्प्याबरोबर काम असल्याचे म्हटले आहे. वैयक्तिक डाटाचा आदर राखण्यात येणार आहे. सर्व डाटा आणि माहिती ही भारत सरकारच्या नियमाप्रमाणे देशामध्येच सुरक्षित केली जाणार आहे. कंपनीच्या माहितीनुसार जागतिक दर्जाचा मल्टीप्लेयर गेमिंगचा अनुभव वापरकर्त्यांना मोबाईलवर घेता येणार आहे. बॅटलग्राऊंडस मोबाईल इंडिया काही गेम इव्हेंट लाँच करणार आहे. त्यामध्ये टुर्नामेंट आणि लीगचाही समावेश असणार आहे. विशेष म्हणजे वापरकर्त्यांना मोबाईलवर हा गेम मोफतपणे खेळता येणार आहे.
हेही वाचा-पश्चिम बंगाल हिंसाचार : केंद्राची चार सदस्यीय समिती आढावा घेण्यासाठी रवाना
नुकतेच पब्जी मोबाईल इंडियाने युट्युब चॅनेलवर नव्या गेमचा टीझर लाँच केला होता. मात्र, त्यामध्ये गेमिंगची माहिती व लाँचिंगची तारीख देण्यात आली नव्हती.
पब्जीवर भारताने घातली होती बंदी-
दरम्यान, वैयक्तिक माहितीची गोपनीयता आणि देशाचे सार्वभौमत्व सुरक्षित ठेवण्याकरता भारताने २ सप्टेंबर २०२० ला १११ मोबाईल अॅपवर बंदी लागू केली होती. त्यामध्ये पब्जीचाही समावेश होता. पब्जीचे जगात ६० कोटी डाऊनलोड आणि ५ कोटी सक्रिय वापरकर्ते आहे. तर भारतामध्ये ३.३ लाख वापरकर्ते होते.