रायगड- अट्टल गुन्हे करणाऱ्यांमध्ये अनेकवेळा गुन्हा केला की एखादी खुणगाठ करण्याची पद्धत असते. अशाच एका आंतराज्य गुन्हेगार टोळीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे पथकाला यश आले आहेत. घरफोडी किंवा चोरी केल्यानंतर ही टोळी त्याठिकाणी दगड ठेवून पसार होत होती. या टोळीचा छडा स्थानिक गुन्हे पथकाने लावला असून तीन आरोपींना मध्यप्रदेश येथून ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून सोने, चांदी व चार मोटार सायकल असा ११ लाख २३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. रायगडसह रत्नागिरी, पुणे, अहमदनगर येथे १५ घरफोडी व ६ चोरीचे असे २१ गुन्ह्यांची कबुली आरोपींनी दिली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर
स्थानिक गुन्हे पथकाने सुनील लालसिंग मुझालदा (वय २३ वर्षे, रा. घोर, जिल्हा - धार, मध्य प्रदेश), रवी उर्फ छोटू मोहन डावर (वय १८ वर्षे रा. जवार, जि. इंदौर, म.प्र.), कपिल गजेंद्र पांचोली उर्फ जैन (वय १८ वर्षे, रा. बोरी, जि. अलीराजपूर, म.प्र) या तीन आरोपींना मध्यप्रदेश येथून अटक केली आहे.
रायगड जिल्ह्यात विशेषतः दक्षिण भागात चोरी, घरफोडी या गुन्ह्यात वाढ झालेली आहे. त्यादृष्टीने स्थानिक गुन्हे शाखेने गुन्ह्याचा आढावा घेऊन गुन्हेगारांची गुन्हे करण्याची कार्यपद्धती, गुन्हे करण्याचे ठिकाण, दिवस, वेळ याचा आढावा घेऊन तपास सुरू केला. या आढाव्यातून एक गोष्ट सारखी होती ती म्हणजे दगड. चोरी किंवा घरफोडी केल्यानंतर ही टोळी त्याठिकाणी आपली छाप म्हणून दगड होते. सीसीटीव्ही कॅमेरॅच्या माध्यमातूनही या टोळीला शोधण्यात यश आले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जमील शेख यांनी पोलीस उपनिरीक्षक अमोल वळसंग यांच्या नेतृत्वाखाली अमोल हंबीर, प्रतीक सावंत, सुनील खराडे, हनुमान सूर्यवंशी यांचे पथक तयार करून तपास सुरू केला. तपासमध्ये आरोपी हे मध्यप्रदेश राज्यातील धार, इंदोर, अलीराजपुर या वेगवेगळ्या जिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार स्थानिक गुन्हे पथक मध्यप्रदेश येथे जाऊन शिताफीने वरील तीन आरोपींना अटक केली.
मध्यप्रदेश येथून आणलेल्या तिन्ही आरोपीची चौकशी केली असता रायगडसह रत्नागिरी, पुणे, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये १५ घरफोडी व ६ चोरी असे २१ गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. या गुन्ह्यात आणखी ५ आरोपींचा शोध सुरू आहे. तिन्ही आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल वळसंग करीत आहेत.