परभणी- घरफोडी, दुचाकी तसेच रस्त्यावरील महिलांना हिसका देऊन त्यांचे दागिने आणि पैशाची पर्स पळणारा सराईत गुन्हेगाराला परभणी पोलिसांनी जेरबंद केले. या चोरट्याला पकडल्याने शहरातील घडलेल्या चार गुन्ह्यांचा तपास लागला आहे. या कारवाईत पोलिसांनी लाखो रुपयांचा मुद्देमालही जप्त केला आहे. विशेष बाब म्हणजे हा चोर महिलांच्या पर्समधील पैसे, दागिने काढून घेत असे, आणि ती पर्स पुन्हा पर्समध्ये असलेल्या कागदपत्रांच्या आधारे त्या पत्त्यावर नेऊन त्या ठिकाणी फेकून देत होता.
जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल असलेले चोरी, घरफोडी, जबरी चोरी तसेच उघडकीस न आलेल्या गुन्ह्यातील आरोपींचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकामार्फत शोध घेण्याचे काम निरंतर चालु असते. अशाच एका गुन्ह्यातील आरोपींचा शोधात पथकाने आरोपी बालाजी विणा माने (वय 28 वर्ष रा. संत गाडगेबाबा नगर परभणी) याला खात्रीशीर माहितीवरुन ताब्यात घेतले. त्याची पोलिसी खाक्या दाखवून चौकशी केली असता, त्याने चार चोरीच्या गुन्ह्याची कबूली दिली.