नवी दिल्ली :Xi Jinping :नवी दिल्लीत ९ आणि १० सप्टेंबर रोजी जी २० गटाच्या वार्षिक शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. जगभरातील महत्वाचे नेते या परिषदेत सहभागी होण्यासाठी भारतात येतील. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन देखील या परिषदेत सहभागी होणार आहेत. मात्र चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या उपस्थितीबद्दल अद्यापही साशंकता आहे.
भारत-चीन सीमेवर तणावाची स्थिती : शी जिनपिंग या परिषदेला उपस्थित राहण्याची शक्यता कमीच आहे. त्यांच्या सहभागाबद्दल चीनकडून अद्याप कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही. भारत आणि चीनमधील सीमेवरचा तणाव हे या मागचं कारण असू शकतं. सध्या भारत - चीन सीमेवर अभूतपूर्व तणावाची स्थिती आहे. दोन्ही देशांतील राजनैतिक संबंधांनी गेल्या काही वर्षातली निच्चांक पातळी गाठलीय. त्यामुळे शी जिनपिंग भारतात होणाऱ्या या परिषदेपासून अंतर राखू शकतात. शी जिनपिंग यांच्या ऐवजी चीनचे पंतप्रधान ली कियांग जी २० परिषदेला हजेरी लावतील. ते नुकतेच जकार्ता येथे झालेल्या पूर्व आशिया शिखर परिषदेतही सहभागी झाले होते.
शी जिनपिंगनं चीनमधून बाहेर जाणं कमी केलं : चीनमध्ये २०२० मध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर नागरिकांवर अत्यंत कडक निर्बंध लादण्यात आले होते. त्या काळात लोकांना घरात अक्षरश: कोंडून ठेवण्यात आलं होतं. यामुळे शी जिनपिंग यांना मायदेशात लोकांच्या रोषाचा सामना करावा लागला होता. त्यांची प्रशासनावरची पकड ढिली होतेय की काय, असंही चित्र होतं. तेव्हापासून शी जिनपिंग यांनी चीनबाहेर जाणं अत्यंत कमी केलंय. लॉकडाऊन लागू केल्यानंतर ते जवळपास दोन वर्ष चीनमधून बाहेर पडले नव्हते. २०२१ मध्येही ते चीनच्या कोरोना निर्बंधांच कारण देऊन जी २० शिखर परिषदेत भाग घेण्यासाठी इटलीला गेले नव्हते.