वॉशिंग्टन Lewiston Maine Shootings :अमेरिकेत पुन्हा एकदा गोळीबाराची घटना समोर आलीय. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील लुईस्टनमध्ये गोळीबार झाल्याचं वृत्त आहे. या गोळीबारात आतापर्यंत 16 हून अधिक जणांचा मृत्यू झालाय. त्याचबरोबर डझनभर लोक जखमी झाले आहेत. तर यातील काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. अमेरिकन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका शार्पशूटरनं हा गोळीबार केलाय. ( several people killed in mass firing )
- लोकांना घरात राहण्याचे आवाहन :अँड्रोस्कोगिन काउंटी शेरीफ कार्यालयानं एक निवेदन जारी करून म्हटलंय की, आम्ही या घटनेची चौकशी करत आहोत. सर्व व्यवसायांना त्यांची आस्थापना बंद करण्यास सांगत आहोत. सार्वजनिक सुरक्षा विभागाच्या विभागाच्या प्रवक्त्यानं लोकांना त्यांचे दरवाजे बंद करून घरात राहण्याचे आवाहन केलंय.
लुईस्टनमध्ये तीन ठिकाणी गोळीबार : लुईस्टनमधील स्पेअरटाइम रिक्रिएशन, स्केमेन्झी बार अँड ग्रिल रेस्टॉरंट आणि वॉलमार्ट वितरण केंद्रासह तीन स्वतंत्र आस्थापनांवर गोळीबार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय. वॉशिंग्टनमधील एका अमेरिकन अधिकाऱ्यानं सांगितलं की, राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना या गोळीबाराच्या घटनेची माहिती देण्यात आली असून ते परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.