वॉशिंग्टन डीसी US House Approves Impeachment Inquiry : अमेरिकेत मोठी राजकीय घडामोड घडत आहेत. संसदेनं बुधवारी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याविरुद्ध त्यांच्या मुलाच्या आंतरराष्ट्रीय व्यवहारांबद्दल महाभियोग चौकशी करण्याचा ठराव मंजूर केला. जीओपीच्या नेतृत्वाखालील सभागृहानं या प्रस्तावावर 221 विरुद्ध 212 मत दिले.
निराधार राजकीय स्टंट : राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी या प्रस्तावावरुन रिपब्लिकन खासदारांवर टीका केलीय. महाभियोगाची चौकशी हा निराधार राजकीय स्टंट असल्याचं त्यांनी म्हटलंय. बायडेन यांनी म्हटलंय की, देश आणि जगासाठी महत्त्वाच्या असलेल्या प्राधान्यक्रमांवर कारवाई करण्यासाठी अमेरिकन लोकांना काँग्रेसमधील त्यांच्या नेत्यांची गरज आहे. युक्रेन आणि इस्रायलला त्यांच्या संबंधित संघर्षांच्या संदर्भात निधी रोखल्याबद्दल त्यांनी रिपब्लिकनवर टीका केली.तसेच सीमा सुरक्षा मजबूत करण्यास समर्थन न दिल्याचा आरोपही केलाय.
बायडेन यांचं टिकास्त्र : बायडेन म्हणाले की, मंगळवारी मी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली. ते रशियन आक्रमणाविरुद्ध स्वातंत्र्याच्या लढ्यात आपल्या लोकांचं नेतृत्व करत आहेत. आमची मदत मागण्यासाठी ते अमेरिकेत आले होते. तरीही काँग्रेसमधील रिपब्लिकन मदतीसाठी पुढे जाणार नाहीत. राष्ट्रपती म्हणाले की, इस्रायलचे लोक दहशतवाद्यांविरुद्ध लढत आहेत. ते आमच्या मदतीची वाट पाहत आहेत. तरीही काँग्रेसमधील रिपब्लिकन मदतीसाठी पुढे जाणार नाहीत. ते पुढे म्हणाले की, आम्हाला दक्षिण सीमेवरील परिस्थितीकडे लक्ष द्यावं लागेल. मी समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यास वचनबद्ध आहे. सीमा सुरक्षा मजबूत करण्यासाठी आम्हाला पैशांची गरज आहे. परंतु, काँग्रेसमधील रिपब्लिकन मदतीसाठी कार्य करणार नाहीत, असं म्हणत बायडेन यांनी रिपब्लिकन खासदारांवर टीका केलीय.